आ. प्रविण पोटे पाटील अमरावतीच्या बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करणार

जिल्ह्यातील आमदारांची हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी

सांस्कृतिक भवनाच्या मुद्यावरही वेधणार लक्ष

अमरावती/26 नोव्हेंबर – 7 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे आ. प्रविण पोटे पाटील यांनी शहरातील गंभीर प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरातील अवैध धंदे, गल्लीबोळांत सुरू असलेले मटका, जुगार आणि नशेच्या पदार्थांची विक्री, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, सांस्कृतिक भवनाचा रखडलेला प्रश्न तसेच महानगरपालिकेतील भ्रष्टाचार यासह अनेक जनहिताचे मुद्दे त्यांनी अधिवेशनात मांडण्याची भूमिका घेतली आहे. अमरावतीच्या नागि रकांना भेडसा वणार्‍या प्रश्नांवर सरकार कडून ठोस उत्तर आणि कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी विविध विषयांची तयारी केली आहे. आपली मातृभूमिच्या विशेष प्रतिनिधीने जिल्ह्यातील विविध आमदारांना आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदार संघातील मुद्यांवर छेडले असता अनेकांनी आपल्या तयारीबाबत माहिती दिली. या अंतर्गत अमरावती शहरात अवैध धंद्यांचे जाळे वाढत असल्याचा आरोप प्रविण पोटे पाटील यांनी केला. गल्लीगल्लीत मटका, जुगार आणि नशेच्या पदार्थांची विक्री खुलेआम सुरू असून, काही लोकप्रतिनिधी अशा  धंद्यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. गुंड, बदमाश आणि अवैध धंदेवाल्यांवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने शहराची ओळख सांस्कृतिक नगरीऐवजी गुन्हेगारी नगरी अशी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ते सभागृहात करणार आहेत. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनाचा प्रश्नही त्यांनी महत्त्वाच्या विषयांमध्ये समाविष्ट केला आहे. शहरातील नाट्य, कला आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी उभारण्यात आलेले भवन आजही कलाकार आणि नाट्यसंस्थांच्या उपयोगात येत नसल्याने त्याचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. हे भवन सर्वसामान्य नागरिक, कलाकार आणि नाट्यसंस्थांना उपलब्ध करून द्यावे, तसेच त्याच्या उभारणीतील खर्च, रॉयल्टी आणि मागील भागातील तोडफोडीच्या मुद्द्यांची चौकशी करावी, अशी मागणी ते करणार आहेत. महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरही त्यांनी निशाणा साधला असून, दोषींवर कारवाई आणि जनतेच्या पैशांचा हिशेब सभागृहात मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

अधिवेशनात गाजणार अमरावतीचे प्रश्न

अमरावती शहरातील अवैध धंदे, मटका-जुगार, नशेच्या पदार्थांची विक्री, पोलिसांची निष्क्रियता, गुन्हेगारीला मिळणारे संरक्षण, सांस्कृतिक भवनाचा रखडलेला वापर, भवनाच्या खर्चातील अनियमितता, मागील भागातील तोडफोड आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर आमदार प्रविण पोटे पाटील अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसह सांस्कृतिक वारसा आणि जनतेच्या पैशांच्या हिशेबाची मागणीही ते करणार आहेत.

Back to top button