परतवाड्यात आमरण उपोषणाचा दुसरा दिवस
आ.बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट

परतवाडा /26 नोव्हेंबर : कृषी उत्पन्न बाजार समिती महामार्गावरील दुकानांसमोर वाढलेले अतिक्रमण काढावे आणि विदर्भ मिल कॉलनी, अमरावती मार्गावरील वादग्रस्त रस्ता दुभाजक तात्काळ हटवावा, या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू भाऊ घोम यांचे आमरण उपोषण सुरू आहे. काल, दिनांक 25 नोव्हेंबर पासून कार्यकर्ते उपोषणस्थळी बसले असून, आज दुसर्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. उपोषणस्थळी शिवसेना शिंदे गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित आहेत. या मागणीचे निवेदन संबंधित विभागाला देण्यात आले असून, तात्काळ कारवाई करून सदर अतिक्रमण काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज दुसर्या दिवशी उपोषणस्थळी माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली. त्यांनी संबंधित विभागाला या संदर्भात ताबडतोब अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या. सदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असून आता याचे सौंदर्यीकरण तसेच नूतनीकरण होणार असल्याने या संदर्भातील गाड्यांना सुद्धा पाठीमागे जागा करून सदर जागा मोकळी करण्याच्या सूचना बच्चू कडू यांनी प्रशासनाला केल्या. तसेच विदर्भ मिल चौकातील रस्ता दुभाजक हटवण्यात यावा, जेणेकरून भविष्यात कोणताही अपघात होणार नाही, याकरीता प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी उपोषणस्थळावर अचलपूरचे ठाणेदार अभिषेक अंधारे, पोलीस प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काळे मॅडम यांनी भेट देत सदर विषयावर चर्चा केली.ङ्गङ्गयावेळी उपोषण स्थळावर बंडू घोम, रितेश अवघड, विलास सोळंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





