अदानी प्रकल्पाची तात्काळ सखोल चौकशी करा

खा.बळवंत वानखडे यांची ठाम मागणी

वन अधिकार्‍यांसोबत घेतली आढावा बैठक

अमरावती/26 नोव्हेंबर – मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी खा. बळवंत वानखडे यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे जंगल आणि आदिवासींचे हक्क धोक्यात येण्याची भीती असल्याने वन विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करावा असे त्यांनी बैठकीत ठणकावून सांगितले. अदानी समूहाच्या वतीने चिखलदरा तालुक्यातील आडनदी आणि कामापूर परिसरात पंप साठवणूक जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या संदर्भात अमरावती येथे खा. बळवंत वानखडे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या वैधानिक परवानग्या आणि सर्वेक्षणाच्या अटींचा भंग झाल्याचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे मांडला. विकासाच्या नावाखाली स्थानिक आदिवासींचे जीवन आणि उपजीविका नष्ट होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका खा. वानखडे यांनी घेतली. वन विभागाने संबंधित सर्व नोंदी तपासून तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. अदानी जलविद्युत प्रकल्पासाठी 28 नोव्हेंबर 2025 आणि 2 मार्च 2026 च्या पत्रानुसार वनखंड क्रमांक 6, 7, 8, 12, 13, 14 आणि 15 मध्ये मोजणी करण्यास परवानगी दिली होती. तसेच वनखंड क्रमांक 12, 13 आणि 14 मधील 3.467 चौरस किलोमीटर परिसरात 54.7 ते 75.7 मिलिमीटर आकाराची केवळ 24 छिद्रे पाडण्याची मुभा देण्यात आली होती. या अटींचे पालन झाले आहे की नाही याची वन विभागाने जागेवर जाऊन तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली. सर्वेक्षणासाठी खोदलेले खड्डे बुजवून जंगल पूर्ववत केले आहे का याचे छायाचित्रांसह सविस्तर पुरावे सादर करावेत असेही त्यांनी सुचवले. भारतीय वन कायदा 1927, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन संवर्धन कायदा 1980 या कायद्यांचे उल्लंघन आढळल्यास प्रकल्पाची परवानगी रद्द करून कठोर कारवाई करावी अशी मागणी खा. वानखडे यांनी केली.

वन्यजीव आणि आदिवासींच्या हक्कांना मोठा धोका

या प्रकल्पामुळे मेळघाटातील मोठे वनक्षेत्र बाधित होणार असून वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि संचार मार्ग धोक्यात येणार आहेत. स्थानिक पाण्याचे स्रोत, जैवविविधता आणि जमिनीची धूप होण्याची दाट शक्यता आहे. ग्रामसभांची संमती आणि वनहक्क कायद्याचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे वन विभागाने झाडांची प्रत्यक्ष मोजणी करून व प्रमाणित नकाशे तपासून आपली भूमिका स्पष्ट करावी असे खा. वानखडे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Back to top button