अचलपूर मतदार संघातील विविध प्रश्नावर आ. प्रविण तायडे आक्रमक
शेतकर्यांच्या मुद्यासह फिनले मिलचा प्रश्न उपस्थित करणार

शेतकरी, रोजगार, पाणीपुरवठा अन् उद्योगांना प्राधान्य
अमरावती /26 नोव्हेंबर – जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आ. प्रवीण तायडे यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात विविध प्रश्न मांडण्याची तयारी केली आहे. शेतकर्यांच्या सिंचन समस्या, बेरोजगारांना रोजगार, अमरावती व अचलपूर परिसरात उद्योगांची उभारणी, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि पर्यटन विकास अशा अनेक विषयांचा त्यां च्या प्रश्न सूचीत समावेश आहे. अचलपूर येथे औद्यो गिक वसाहत उभारून रोजगार निर्मिती, एमआयडीसीची स्थापना, नवीन प्रशासकीय इमारत, पूल बांधकाम, महाविद्यालयीन सुविधा आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यावर ते भर देणार आहेत.आ. प्रवीण तायडे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा आढावा घेतला. अचलपूरमध्ये औद्योगिक वसाहत सुरू झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच परिसरातील आर्थिक उलाढाल वाढेल, असा त्यांचा दावा आहे. अचलपूर पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्याचाही त्यांचा प्रयत्न राहणार आहे. अचलपूर, परतवाडा आणि चांदूर बाजार शहरांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करणे, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, नदी प्रदूषण रोखणे आणि नदीकाठाचा विकास यासाठीही ते पाठपुरावा करणार आहेत. यासोबतच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक निदान सुविधा, आघात उपचार केंद्र, महाविद्यालयीन प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे मुद्दे अधिवेशनात मांडले जाणार आहेत.
औद्योगिक वसाहतीतून रोजगाराला चालना-अचलपूरमध्ये औद्योगिक वसाहत उभारल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, उद्योगांना चालना मिळेल आणि परिसराचा आर्थिक विकास साधता येईल. शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन सुविधांसाठी शासनाकडे निधी व आवश्यक उपाययोजनांची मागणी करणार असल्याचे आ.प्रवीण तायडे यांनी सांगितले.





