समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश विरुळ शिवारात अपघात, कारला ट्रकची धडक

वर्धा /20 जुलै : समृद्धी महामार्गावर ट्रकने कारला धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघातविरुळ शिवारात 20 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडला. या अपघातात सालोड (हिरापूर) येथील एका कुटुंबातील तीन जण,
कारचालक तसेच ट्रकचालक, क्लिनरचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा येथून इथेनॉल भरलेला टँकर समृद्धी महामार्गाने पुण्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, विरुळलगतच्या शिवारात इथेनॉल भरलेला टँकर उलटला. त्यामुळे या मार्गावरील
वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई – नागपूर दिशेने टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. यादरम्यान, नागपूर
कॅरिडोरमध्ये नागपूर दिशेने जात असलेल्या आयसर ट्रकने पुढे उभ्या असलेल्या कारला मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात
कार अक्षरश: चेंदामेंदा झाली. यावेळी आयशर ट्रक आणि कारचा काही भाग आग लागल्याने जळाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, पुलगाव पोलिस, अग्निशमन दल, बचाव पथक आदी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली.अपघातात कारमधील राजेश आनंदराव टिपले, सुषमा राजेश टिपले, जानवी राजेश टिपले तसेच अंकुश लक्ष्मण राऊत सर्व रा. सालोड (हिरापूर), जि. वर्धा यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अपघातात ट्रक चालक संजय कुमार, क्लिनर समरजीत पाल या दोघांचाही मृत्यू झाला. महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मृतदेह रुग्णालयातशवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना
कारखेले, ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी भेट दिली. तसेच महामार्ग पोलिस केंद्राच्या सहायक पोलिस निरीक्षक सरिता यादव,
पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी तोडासे, भारत पिसुड्डे, अशोक भोगे, नितीन काकडे यांच्यासह पुलगाव पोलिस, महामार्गाचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सालोड (हिरापूर) येथील सुभाष टिपले आणि कुटुंबिय पुण्याहून परत येत होते. दरम्यान, या भीषण अपघातात या कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली.




