राजकमल रेल्वे पूल पाडण्याचे काम वेगात
जुना पूल जमीनदोस्त करून नवी उभरणी

अमरावतीकर नागरिकांची गैरसोय लवकर संपणार
अमरावती /7 जुलै – अमरावतीमधील अत्यंतधोकादायक झालेला राजकमल रेल्वे पूलअखेर पाडण्यास सुरुवात झाली असून, यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हा पूल जीर्ण झाल्यामुळे बर्याच काळापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सुमारे 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रशासनाने पुलाचा वरचा भाग पाडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता पुलाचे दगडी खांब जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबईतील मत्ते असोसिएट्स या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले असून, रेल्वेच्या वाहतुकीला कोणताही धक्का न लावता अत्यंत काळजीपूर्वक हे पाडकाम सुरू आहे. हे सर्व काम चालू महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. 1963 मध्ये बांधलेला हा पूल 63
वर्षांनंतर आता काळाच्या पडद्याआड जात आहे. पुलाच्या बांधकामात सिमेंटऐवजी लाल माती आणि दगडांचा वापर केल्याचे दिसून आले आहे. सध्या जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने फलाट क्रमांक एकच्या बाजूची संरक्षक भिंत पाडण्याचे काम वेगात सुरू आहे. या पुलाच्या पुनर्रचना कामासाठी आ. सुलभा खोडके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे शासनाने 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून आता नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. जुन्या पुलाचे पाडकाम जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने अमरावतीकरांचा प्रवास सुसह्य होण्यासाठीचा मार्ग मोकळा होत आहे




