चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम 8 वर्षे रखडले
अमरावतीकर धुळीने आणि वाहतूक कोंडीने त्रस्त

लोकप्रतिनिधींनो आता कोरडे आश्वासन नको; काम दाखवा
अमरावती/21 जून- शहरातील चित्रा चौक ते वलगाव दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे काम 2016 मध्ये मंजूर झाले असून ते 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु 2026 उजाडले तरीही हे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने अमरावतीची जनता तीव्र संतापात आहे. या विलंबाने रोजची वाहतूक कोंडी, हवेतील प्रचंड धूळ आणि रस्त्याच्या कडेला वाढलेले अवाजवी अतिक्रमण यामुळे स्थानिक नागरिक पार बेजार झाले असून आता लोकप्रतिनिधींनी केवळ कोरडी आश्वासने न देता प्रत्यक्ष काम पूर्ण करून दाखवावे, अशी आग्रही मागणी संपूर्ण परिसरातून जोर धरू लागली आहे.
या रखडलेल्या पुलाच्या संथ कारभाराबाबत आता जनता थेट खा. बलवंत वानखडे, आ. संजय खोडके, आ. प्रवीण पोटे, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. बच्चू कडू यांच्यासह भाजपा, काँग्रेस, शिवसेना आणि इतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना जाहीरपणे जाब विचारत आहे. पुलाचे काम तातडीने युद्धपातळीवर हाती घेऊन ते पूर्ण करावे, रस्त्याशेजारील बेकायदेशीर अतिक्रमण कडक मोहीम राबवून हटवावे आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ पर्यायी व सुरक्षित वाहतूक व्यवस्था अमलात आणावी, अशी एकमुखी मागणी येथील वैतागलेली जनता करत आहे. त्याचसोबत या कामाच्या भयानक विलंबासाठी जबाबदार असणार्या दोषी घटकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करून त्यांची जबाबदारी निश्चित करायला हवी. विकास हा आमचा मूलभूत अधिकार असून तो आता आणखी लांबणीवर टाकू नका आणि पोकळ आश्वासनांऐवजी थेट कामाचा निकाल द्या, असा आक्रमक पवित्रा अमरावतीच्या नागरिकांनी आता घेतला आहे.
अमरावतीकरांचा संतप्त सवाल
चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम 2016 पासून रखडल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत 2020 ची मुदत संपून 2026 आले तरी पूल अपूर्णच आहे खा बलवंत वानखडे आ संजय खोडके आ प्रवीण पोटे खा डॉ अनिल बोंडे आ बच्चू कडू यांनी जनतेला उत्तर द्यावे केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष काम पूर्ण करून दाखवा हाच आमचा हक्क.




