वृत्तपत्रातील शाईमुळे कर्करोगाचा वाढतोय धोका

नकली दूध पनीर आरोग्याशी खेळ

 रसायनांद्वारे फळे पिकवण्याचे प्रमाण वाढले

अमरावती /8 जून- जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित आहाराचा संदेश दिला जात असतानाच, अमरावती शहर व जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. बाजारपेठा, हातगाड्या आणि हॉटेलमध्ये समोसे, कचोरी, भजी यांसारखे तेलकट खाद्यपदार्थ अजूनही वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून दिले जात आहेत. दुसरीकडे, रसायनांनी पिकवलेली फळे, नकली पनीर, भेसळयुक्त दूध आणि संशयास्पद चांदीचा वर्ख नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका बनत चालला आहे. तज्ज्ञांच्या मते, वृत्तपत्राच्या छपाईच्या शाईतील घातक रसायने आणि खनिज तेल गरम अन्नासोबत पोटात गेल्याने पोटाचे विकार, यकृताच्या समस्या आणि थेट कर्करोगाचा (कॅन्सर) धोका निर्माण होतो. अन्न सुरक्षा मानकांनुसार गरम व तेलकट पदार्थांसाठी फूड-ग्रेड पॅकेजिंग वापरणे बंधनकारक आहे, मात्र विक्रेते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. मिठाईवरील नकली चांदीचा वर्ख आणि रसायनांनी पिकवलेली फळे ही देखील मोठी चिंतेची बाब आहे. या गंभीर समस्येवर जिल्हा प्रशासन व अन्न सुरक्षा विभागाकडून कडक कारवाई सुरू आहे. सहाय्यक आयुक्त विनय चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यात 235 खाद्यपदार्थांची तपासणी करून 193 संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यांपैकी 9 प्रकरणांवर थेट कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, ज्यात 3 असुरक्षित, 4 कमी दर्जाचे आणि 2 बोगस नमुने आढळले आहेत. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधितांवर कडक गुन्हे दाखल केले जात आहेत. सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी खरेदी करताना गुणवत्ता तपासावी आणि संशयास्पद वस्तूंची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button