दोन अधिकारी तडकाफडकी निलंबित

अमरावती बसस्थानकात अस्वच्छता आढळल्याने

कर्मचार्‍यांच्या व्यथा ऐकत उघडला कारभार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कारवाई

अमरावती /7 जून- स्थानिक अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी अचानक धडक तपासणी करून प्रशासनातील निष्काळजी पणाचा पर्दाफाश केला.
बसस्थानकातील अस्वच्छता, चालक व वाहकांच्या विश्रांती गृहातील गैरसोयी, स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची बेपर्वाई उघड झाल्यानंतर आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे व विशेष सुरक्षा दक्षता अधिकारी जीवन वानखडे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे एसटी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे रविवारी अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. शहरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सुमारे 9.45 वाजता त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट अमरावती मध्यवर्ती बसस्थानक गाठले. बसस्थानकातील प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. सुरुवातीला त्यांनी 36 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या संत सीतारामदासजी बाबा पाणपोईला भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी बसस्थानकाच्या विविध भागांची पाहणी सुरू केली. नागपूर मार्गावरील फलाटावर स्वच्छतेचे काम सुरू असले तरी पुढे जाताच बसस्थानकातील वास्तव चित्र समोर आले. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग, अस्वच्छ परिसर आणि दुर्गंधीयुक्त वातावरण पाहून मंत्री संतप्त झाले. उद्घोषणा कक्षाची अवस्थाही अत्यंत खराब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहाची पाहणी केली. यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांनी आपल्या अडचणी थेट मंत्र्यांसमोर मांडल्या. प्रचंड उष्णतेच्या दिवसांतही पुरेशी हवा मिळत नाही, विश्रांतीसाठी गाद्या व चादरींची कमतरता भासते, अनेकदा स्वतःच्या घरातून अंथरूण आणावे लागते, अशी व्यथा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. तपासणीपूर्वी केवळ देखाव्यासाठी काही सुविधा उभारल्या जातात; मात्र नंतर परिस्थिती पूर्ववत होते, असा आरोपही कर्मचार्‍यांनी केला. कर्मचार्‍यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीने बोलावून घेतले. आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे आणि विशेष सुरक्षा दक्षता अधिकारी जीवन वानखडे घटनास्थळी दाखल झाले. मात्र मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात त्यांना अपयश आले. दिवसभर स्वागतासाठी उपस्थित असलेले अधिकारी प्रत्यक्ष कामकाजाच्या वेळी निष्क्रिय असल्याचेही समोर आले. तपासणीदरम्यान चालक व वाहकांसाठी राखीव असलेल्या स्वच्छतागृहांचा वापर बाहेरील व्यक्तींकडून होत असल्याची बाबही उघड झाली. त्यामुळे कर्मचार्‍यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष पाहून संतप्त झालेल्या प्रताप सरनाईक यांनी वैशाली भाकरे आणि जीवन वानखडे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. या धडक कारवाईनंतर एसटी प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून बसस्थानकांतील सुविधा, स्वच्छता आणि कामकाजाबाबत अधिक जबाबदारीने काम करण्याचा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
कर्मचार्‍यांच्या तक्रारींनी उघडला निष्काळजीपणा-चालक व वाहकांनी विश्रांतीगृहातील अस्वच्छता, गाद्या व चादरींचा तुटवडा, उष्णतेतही अपुर्‍या सोयी आणि स्वच्छतागृहांच्या गैरव्यवस्थेबाबत थेट परिवहन मंत्र्यांकडे तक्रारी मांडल्या. तपासणीपूर्वी केवळ दिखाऊ व्यवस्था केल्याचा आरोपही कर्मचार्‍यांनी केला. याच तक्रारींनंतर दोन अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button