परतवाड्याच्या जयस्तंभ चौकातून चालायचा सेक्स रॅकेटचा धंदा
व्हिडिओ प्रकरणाचा तपास अधिक गडद

अयान अहमदच्या पापकर्माचा शहरात प्रचंड उद्रेक
तासाभराच्या बोलीवर लॉजमध्ये चालत होता अश्लील खेळ
नराधमांच्या टोळीला आता भरचौकात फासावर लटकवा
परतवाडा /16 एप्रिल– शहराच्या संस्कृतीला आणि अब्रूला काळिमा फासणार्या त्या अल्पवयीन मुलींच्या चित्रफित प्रकरणाने आता संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. या काळ्या कृत्याचा मुख्य सूत्रधार असलेला नराधम अयान अहमद हा जयस्तंभ चौक परिसरात एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा फिरत होता, ही बाब समोर आल्याने शहरात संतापाचा वणवा पेटला आहे. जयस्तंभ चौकातील एका चहाच्या टपरीवर तासनतास बसून, कुणाशीही संवाद न साधता केवळ भ्रमणध्वनीवर गुंतलेला अयान आपल्या पापाचे जाळे विणत होता. रात्री उशिरापर्यंत या परिसरात त्याचा असलेला वावर आणि त्याच्या गुप्त हालचालींमुळेच हे भयानक रॅकेट इतके दिवस छुप्या पद्धतीने सुरू राहिले असावे, असा प्राथमिक संशय आता तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक आणि स्फोटक खुलासा म्हणजे जयस्तंभ चौक परिसरातील काही लॉज आणि हॉटेलमध्ये चालणारा हा घृणास्पद व्यापार! केवळ काही रुपयांच्या हव्यासापोटी या हॉटेल मालकांनी आपल्या नीतिमत्तेची विक्री केली आहे. तासाभराच्या आधारावर खोल्या देऊन या ठिकाणी निष्पाप मुलींच्या आयुष्याशी खेळ केला जात होता. येथे येणार्यांची ओळखपत्रे का तपासली गेली नाहीत? अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये प्रवेश देताना नियमांना केराची टोपली का दाखवली गेली? असे दाहक प्रश्न आता शहरातील जागरूक नागरिक विचारत आहेत. या लॉजमधील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि नोंदवह्यांची तपासणी केल्यास शहरातील अनेक पांढरपेशी गुन्हेगारांचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांसमोर आता या प्रकरणातील पीडित मुलींची नेमकी संख्या शोधण्याचे मोठे आव्हान आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा मुळापासून शोध घेत असून, अयान अहमदच्या भ्रमणध्वनीमधील माहितीवरून अनेक धक्कादायक पुरावे हाती लागत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अयान हा केवळ एक प्यादे असून, यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता आहे. शहरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशी एकमुखी मागणी जनसामान्यातून होत आहे. आता नागरिकांचा संयम सुटत चालला असून, अशा नराधमांना आणि त्यांना जागा उपलब्ध करून देणार्या हॉटेल मालकांना वेळीच ठेचले नाही, तर शहराची सुरक्षितता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेत, या प्रकरणाचा छडा लावून पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
अल्पसंख्याक आयोग परतवाड्यात दाखल
परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि चित्रफित प्रसारित प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे 9 सदस्यीय पथक आज शहरात धडकले. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या आदेशावरून विशेष अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या नेतृत्वात हे पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले. यामध्ये तीन महिला अधिकार्यांचा समावेश असून त्यांनी एसआयटी प्रमुख डॉ. शुभमकुमार व तपास अधिकारी सुरेश म्हस्के यांच्याशी बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा केली. आतापर्यंत झालेली कारवाई, आरोपींचे धागेदोरे आणि पीडितांना मिळणारा न्याय यावर या भेटीत विशेष भर देण्यात आला. आयोगाच्या या सक्रियतेमुळे तपासाला वेग आला असून दोषींवर कठोर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. नियमबाह्य कृत्य करणार्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा कडक इशारा या दौर्यातून देण्यात आला आहे.




