कठोरा रोडवरील फ्लॅटमध्ये दिवसा अयान मुलींना आणत होता, सगळेच चुप कसे?
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मोठा खुलासा

मुख्य आरोपीसह आठ जणांना बेड्या ठोकल्या
खासगी घरांचाही वापर केल्याचा संशय
गुन्हेगारी टोळी आणि आर्थिक लुटीचा संशय
अमरावती/16एप्रिल: अचलपूर- परतवाडा शहरात तीन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या आणि संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणार्या लैंगिक शोषण प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणाच्या मुळाशी जात असताना पोलिसांनी आज आणखी चार नराधमांना बेड्या ठोकल्या असून, आता एकूण आरोपींची संख्या आठ झाली आहे. मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्या अघोरी कृत्यात साथ देणारे त्याचे मित्र आणि निवारा देणारे घरमालक आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आता वर्धा जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, हे केवळ लैंगिक शोषणाचे प्रकरण नसून यामागे एखादी मोठी गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी व्यक्त केला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर पाढा वाचताना पोलीस प्रशासनाने सांगितले की, यापूर्वी मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याच्यासह उजेर खान, मोहम्मद सहाद आणि तबरेज खान या परतवाडा येथील चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आज अचलपूर येथील एहफाक खान मंसूर खान, शेख नावेद शेख हसन, मो. इमरान मो. सादीक आणि वर्धा येथील रहिवासी मानव दीपक सुगंधे यांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी अयान अहमद याने विविध पीडितांचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चित्रफीत तयार केल्या होत्या. या कृत्यासाठी अमरावती शहरातील कठोरा मार्ग परिसरातील एका इमारतीचा वापर करण्यात आला होता. अयानच्या एका मित्राने आपला गाळा या काळ्या कृत्यासाठी उपलब्ध करून दिला होता, ज्याला आता सहआरोपी म्हणून जेरबंद करण्यात आले आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना अचलपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सर्व आरोपींच्या घरांची झडती घेतली असून तेथून लॅपटॉप, भ्रमणध्वनी, टॅब आणि इतर विदा संच (इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स) जप्त केले आहेत. हे सर्व साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या चित्रफीतच्या माध्यमातून पीडित मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर धनउगाही किंवा खंडणी उकळली जात होती का, या दिशेने आता तपास चक्रावून सोडणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणात अद्याप कोणतीही पीडिता किंवा तिचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतःहून (सुमोतो) तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात काही खाजगी शिकवणी वर्गांचे कनेक्शन असण्याची शक्यता असल्याने पोलीस आता त्या संस्थांच्या हालचालींवरही लक्ष ठेवून आहेत.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही पीडित मुलीने किंवा त्यांच्या पालकांनी न घाबरता पुढे येऊन आपली बाजू मांडावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमांवर पीडितांची ओळख उघड होईल असे कोणतेही संदेश किंवा छायाचित्रे प्रसारित करू नयेत, असे केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पोलीस तपासात सहकार्य करावे, असे आवाहन करत या प्रकरणातील इतर काही संशयित आरोपी देखील लवकरच एसआयटीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यत आठ आरोपी अटकेत एसपी तपासाची दिशा सांगत आहेत
पोलीस अधीक्षकांच्या पत्रकार परिषदेतील तपासाचे मुख्य धागेदोरे
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य सूत्रधार अयान अहमद याच्यासह आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी पीडितांचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर प्रसा रित केले. या प्रकरणात कठोरा मार्ग येथील एका घरमाल कालाही ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींच्या घरांतून लॅपटॉप आणि भ्रमणध्वनी यांसारखी विद्युतीय उपकरणे जप्त करून न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आली आहेत. ही केवळ वैयक्तिक कृती नसून यामागे मोठी गुन्हेगारी साखळी किंवा धन उगाहीचा (खंडणी) प्रकार आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. तसेच गरज पडल्यास काही खाजगी शिकवणी वर्गांचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीडितांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, त्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, अशी ग्वाही देखील या वेळी देण्यात आली.




