शेगावजवळ विद्युत वाहिनी तुटल्याने अमरावती-मुंबई रेल्वेची चाके थांबली

भुसावळवरून दुसरे इंजिन आल्यावरच रेल्वेगाडी वाहतूक पूर्ववत होणार

अमरावती /1 जून- रेल्वेच्या ओव्हरहेड केबलमधून इंजिनला वीज पुरवठा करणारे पेंटाग्राफ अचानक तुटल्यामुळे अमरावती ते मुंबई जाणारी रेल्वे गाडी शेगाव जवळ विस्कळीत झाली असून यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, तर भर उन्हात गाडी थांबल्याने प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. जोपर्यंत भुसावळ रेल्वे स्थानकावरून दुसरे रेल्वे इंजिन येत नाही तोपर्यंत ही गाडी पुढे जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी किमान तीन तासांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातामुळे अमरावती ते पुणे एक्सप्रेससह इतरही अनेक महत्त्वाच्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर खोळंबल्याने हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.
स्थानिक अमरावती रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाण्यासाठी निघालेली रेल्वे गाडी नेहमीप्रमाणे आपल्या गतीने धावत होती. शेगाव रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच अचानक रेल्वेच्या वर असलेल्या विजेच्या तारेमधून इंजिनला वीज खेचणारे पेंटाग्राफ तांत्रिक बिघाडामुळे कडकडून तुटले. हा प्रकार घडताच संपूर्ण रेल्वे गाडीला एक मोठा हादरा बसला आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने गाडी शेगावच्या अलीकडेच थांबली. पेंटाग्राफ तुटल्याचा आवाज एवढा मोठा आणि भयंकर होता की रेल्वेतील प्रवाशांना नक्की काय झाले हे कळेनासे झाले होते. गाडी अचानक निर्जन ठिकाणी उभी राहिल्याने आणि पंखे, दिवे बंद झाल्याने आबालवृद्धांचे प्रचंड हाल सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हरहेड केबल आणि इंजिनची पाहणी सुरू करण्यात आली आहे. मात्र घटनास्थळी दुरुस्ती करणे शक्य नसल्याने आता भुसावळवरून तातडीने दुसरे रेल्वे इंजिन मागवण्यात आले आहे. भुसावळवरून नवीन इंजिन येथे येण्यासाठी आणि गाडीला जोडून ती पुढे मार्गस्थ करण्यासाठी किमान तीन तास लागतील अशी माहिती रेल्वे कर्मचार्‍यांनी दिली आहे.दरम्यान भर रुळावर गाडी थांबल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मध्य रेल्वेच्या या मुख्य मार्गावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणार्‍या इतरही अनेक गाड्या जागच्या जागी थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.
प्रवासी कमालीचे हैराण-मुख्य रेल्वे मार्गावर ओव्हरहेड केबल तुटल्याने अमरावती ते पुणे एक्सप्रेस ही गाडीसुद्धा मधल्याच एका स्थानकावर थांबवावी लागली आहे. आधीच कडक ऊन आणि त्यात गाडी जंगलात थांबल्याने लहान मुले व महिला पाण्यासाठी व्याकुळ झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button