प्रवीण पोटेंसमोर सारेचे थिटे, बाजोरियांच्या पाठीशी सेना नाही

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत

अमरावती /1 जून- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपने प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिल्यानंतर, त्यांच्या विरोधात विरोधकांकडून कोणालाही ठोस उमेदवारी दिली नसल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विप्लव बाजोरिया हे माजी आमदार असून, त्यांनी 2018 मध्ये हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजय मिळवला होता.
यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत, आपले वडील व ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आज आपला अर्ज दाखल केला. आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना विप्लव बाजोरिया यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक ते स्वतंत्रपणे लढवणार आहेत. अनेक नगरसेवकांनी आग्रह केल्यामुळे आणि आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर आपण हा निर्णय घेतला असून, या निवडणुकीत आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या घटनेनंतर महायुतीमधील नेत्यांची धावपळ वाढली आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत कोणतीही फूट नसल्याचा दावा केला आहे. बावनकुळे यांच्या मते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच चर्चा करून अशा नाराज उमेदवारांची समजूत काढली जाईल आणि त्यांना माघार घ्यायला लावली जाईल. महायुतीचे सर्व उमेदवार शेवटच्या क्षणी एकत्र दिसतील, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांचे मत काहीसे वेगळे आहे. बाजोरिया यांना निवडणूक जिंकण्याचा अनुभव असल्याने त्यांना गांभीर्याने घेणे महायुतीसाठी गरजेचे होते, मात्र बाजोरिया यांना स्थानिक नेते कार्यकर्ते व पक्षांची अजीबात साथ नसल्यामुळे त्यांची उमेदवारी प्रबळ ठरु शकत नाही. सध्या या संपूर्ण प्रकरणावर दोन प्रमुख शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता म्हणजे, पुढील दोन दिवसांत महायुतीकडून बाजोरिया यांच्याशी चर्चा करून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले जाईल. दुसरी शक्यता अशी की, जर बाजोरिया यांनी माघार घेण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना शिवसेना (शिंदे गट) पक्षातून काढून टाकले जाऊ शकते. सध्या सर्व राजकीय घडामोडींवर विविध गट लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत काय निर्णय होतो आणि महायुती आपली रणनीती कशी आखते, यावरच या निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून असेल. या दोन दिवसांत अनेक धक्कादायक राजकीय पत्ते खेळले जाण्याची दाट शक्यता आहे. बाजोरिया बाहेरिल उमेदवार आहेत. या मुद्यांवरच त्यांच्या प्रचाराची ताकद निघुन गेली असून कोणीही त्यांच्यासोबत नसल्याचे आज उघडपणे दिसले.

संबंधित बातम्या

Back to top button