शालेय गणवेश योजनेत ऐनवेळी बदल; शाळांची धावपळ
एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन, दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा समारोप

अमरावती/31 मे- अमरावती येथील अशोक नगरमधील कपिल मंडळी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध जयंती आणि त्यागमुर्ती माता रमाबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित दहा दिवसीय बौद्धचार्य श्रामणेर शिबिराचा समारोप भव्य धम्म मेळाव्याने झाला. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख एम. डी. सरोदे यांनी माता रमाबाईंच्या संघर्षावर प्रकाश टाकत त्यांना ’मूक शक्ती’ म्हणून अभिवादन केले. सरोदे म्हणाले की, बाबासाहेबांच्या ध्येयावर रमाबाईंचा अढळ विश्वास होता. गरिबी आणि कौटुंबिक संकटांतही त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी खंबीर साथ दिली. त्यांच्या त्यागामुळेच सामाजिक परिवर्तनाचा महासंघर्ष उभा राहिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष भदंत शक्यपुत्र राहुल यांनी तरुणांना आंबेडकरी चळवळीत सक्रीय होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, चळवळ ही केवळ पोट भरण्याचे साधन नसून तिला बळकटी देणे काळाची गरज आहे. राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांनी ऑक्टोबरमधील जाहीर सभेच्या नियोजनावर भर दिला. कार्यक्रमात विविध भदंत आणि पदाधिकार्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विलास नागदिवे यांनी केले, तर सुनीता भटकर यांनी आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बडनेरा शहर अध्यक्ष के. डी. सांबारे, विजय बागडे, सुरेश दहाटे, व्ही. एस. मेश्राम, अशोक बनसोड, समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकार्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.




