गोडे अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान सोहळा उत्साहात

गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन केला सन्मान

अमरावती /22 मार्च : येथील डॉ. राजेंद्र गोडे तांत्रिक व संशोधन संस्थेमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा पदवी वितरण समारंभ 20 मार्च 2026 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात विविध शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदव्या बहाल करण्यात आल्या. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, विद्यार्थ्यांनी आधुनिक युगातील आव्हाने पेलण्यासाठी कल्पक संशोधन आणि उद्योजकतेवर भर द्यावा, असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर सी. जिरापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन ए. कोळी आणि उपकुलसचिव सौ. मोनाली तोटे (पाटील) यांची उपस्थिती होती. सुरुवातीला माता सरस्वती, संत गाडगे बाबा आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत डॉ. राजेंद्रजी गोडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सागर जिरापुरे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ. नितीन कोळी यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञानाचा वापर लोककल्याणासाठी करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाण्यासाठीच्या ऐतिहासिक संघर्षाचा दाखला देत समता व राष्ट्रीय एकात्मता हाच प्रगतीचा मार्ग असल्याचे सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर विभाग प्रमुख प्रा. कांचन पिंगळे, डॉ. नितीन एन. मोरे, डॉ. एच. आर. धनबर, डॉ. गौरव डी. धाडसे, डॉ. एम. आर. धर्मे आणि डॉ. आर. एस. दुर्गे यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले आणि सर्व पदवीधरांनी सामूहिक दीक्षांत शपथ घेतली. तेजस भटकर या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतातून महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. सोनाली पवार व प्रा. राहुल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एच. आर. धनबर यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

संबंधित बातम्या

Back to top button