एकाच दिवशी 1214 कृषि केंद्रांची तपासणी

‘एक दिवस बळीराजासाठी’ अभियान

-उत्कृष्ठ निविष्ठा मिळवून देण्यावर भर
अमरावती / 17 जून: शेतकर्‍यांना उत्कृष्ट दर्जाची कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून 13 जून रोजी ‘एक दिवस बळीराजासाठी’ एक दिवसीय अभियान राबवण्यात आले. या अभियानात एकाच दिवशी जिल्ह्यातील 1 हजार 434 कृषी निविष्ठा केंद्रांपैकी 1 हजार 214 केंद्रांची तपासणी करण्यात आली.
या अभियानात कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची विक्री योग्य दरात होणे, तसेच बियाणांची जादा दराने विक्री, बियाण्यांसोबत इतर निविष्ठांची सक्तीची खरेदी, बियाणे, रासायनिक खते उपलब्ध असूनही न देणे, अनधिकृत बियाण्यांची विक्री आणि बोगस कीटकनाशकांची विक्री यांसारख्या तक्रारींची तपासणी करण्यात आली. यासोबतच कृषी केंद्राचे नाव, परवाना दर्शनी भागात लावणे, बिलबुक प्रमाणीत करणे, साठा, दर फलक लावणे, भरारी पथकातील सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक प्रदर्शित करणे, नो लिंकींगचे पोस्टर लावणे असल्याची खात्री करण्यात आली.
प्रत्येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आदी कर्मचारी, अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण दिवसभर तपासणी करण्यात आली. शेतकर्‍यांना तक्रारी नोंदवण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांचे संपर्क क्रमांक, तसेच तालुकास्तरीय भरारी पथकातील सर्व सदस्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्यात आले. याव्यतिरिक्त, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना चांगल्या दर्जाच्या कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात यासाठी जिल्हास्तरावर एक पथक आणि तालुका स्तरावर एकूण 14 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
तक्रार नोंदवण्यासाठी गुगल फॉर्म देखील तयार करण्यात आला आहे, ज्याचा क्यूआर कोड सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर लावण्यात आला आहे. शेतकरी हा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा 808053662 या व्हॉट्सप क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतील. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक कृषी निविष्ठा विक्री केंद्रातूनच रीतसर पावती घेऊन खरेदी करावी. कोणत्याही अनधिकृतपणे विकल्या जाणार्‍या एचटीबीटी कापूस बियाण्यांना बळी पडू नये, तसेच कृषी निविष्ठा विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करताना विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

Back to top button