आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी पाहणी
आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध ठिकाणचा घेतला आढावा

अमरावती/1 जून- शहरातील आरोग्य आणि शैक्षणिक सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व जनसामान्यांसाठी सोयीस्कर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्त वर्षा लांडगे यांनी सोमवारी, 1 जून 2026 रोजी शहराच्या विविध भागांत अचानक पाहणी दौरा करत कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौर्यात त्यांनी आयसोलेशन रुग्णालय, मोदी हॉस्पिटल आणि महानगरपालिका शाळांना थेट भेटी देत सोयी-सुविधांची पाहणी केली.
पाहणी दौर्याची सुरुवात आयसोलेशन रुग्णालयापासून झाली. आयुक्त लांडगे यांनी रुग्णसेवेचा दर्जा, औषधसाठा, डॉक्टर्स आणि कर्मचार्यांची उपस्थिती, स्वच्छता आणि उपचार पद्धतीची झाडाझडती घेतली. रुग्णांना वेळेत व प्रभावी उपचार मिळावेत यासाठी यंत्रणेला त्यांनी कडक निर्देश दिले. यानंतर त्यांनी मनपा शाळा जवळा आणि बडनेरा येथे भेट देऊन शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेतला. शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापन पद्धती आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी करत त्यांनी गुणवत्तापूर्ण कामाचा आग्रह धरला. बडनेरा शाळेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता, तातडीने अतिरिक्त वर्गखोल्या बांधण्याचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी बांधकाम विभागाला दिले. दौर्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदी हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपत्कालीन सेवा आणि रुग्णांना मिळणार्या सुविधांचा आढावा घेतला. आरोग्य आणि शिक्षण या दोन प्रमुख सेवांमध्ये कोणतीही तडजोड न करता, पारदर्शक व उत्तम सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासनाची मुख्य प्राथमिकता असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या पाहणी दौर्यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, साहाय्यक आयुक्त भूषण पुस्तकं, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेहाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, डॉ. स्वाती कोडे, डॉ. देवेंद्र गुल्हाने, डॉ. अश्विनी खडसे, उद्यान अधीक्षक अजय विंचूरकर, मालमत्ता अधिकारी सचिन मांडवे, उपअभियंता शरद तिनखेडे, लक्ष्मण पावडे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




