कर्मचार्‍यांच्या सोयी-सुविधांसाठी कटीबद्ध

सुरक्षित प्रवासीसेवा; एस.टी.चालक-वाहक

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन थाटात

अमरावती /1जून : अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आमदार संजय खोडके, आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे, प्रीतीताई संजय बंड, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदकिशोर नवाथे, विभागीय सचिव मोहित देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले की, 1948 मध्ये स्थापन झालेल्या एसटी महामंडळाने गेल्या 78 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले, तरीही प्रवाशांना सुरक्षित, गतिमान आणि आरामदायी सेवा देण्यावर भर दिला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रवाशांसाठी एसटी आजही जीवनवाहिनी ठरली असून, ती संस्कृती व परंपरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. भविष्यात एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि कर्मचारी-चालक-वाहकांच्या सुविधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सोहळ्यात गतवर्षी 260 दिवस विनाअपघात सेवा बजावणार्‍या वाहनचालकांचा प्रत्येकी 1500 रुपये रोख आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, 25 वर्षे सेवा देणार्‍या चालकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. दरम्यान, अमरावती ते संभाजीनगर या नवीन ’परिवर्तन’ बससेवेचा शुभारंभ आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते बस पूजनाने झाला. आ.संजय खोडके यांनी सांगितले की, अमरावती बस स्थानकाची दुरवस्था लक्षात घेता, पुनर्रचना व विस्तारीकरणासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करून आणला आहे. लवकरच बस स्थानकाचा कायापालट होईल, ज्यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचार्‍यांनाही दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल मोहोड यांनी केले, तर आभार शक्ती चव्हाण यांनी मानले.

संबंधित बातम्या

Back to top button