अंजनगाव सुर्जीत शस्त्रास्त्रांसह तीन अट्टल गुन्हेगारांना अटक
पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन धारदार तलवारी, तीन भ्रमणध्वनी, एक दुचाकी जप्त

अंजनगाव सुर्जी, अमरावती, परतवाड्यातील आरोपी जेरबंद
परतवाडा रस्त्यावरील पद्मश्री उपाहारगृहाजवळील घटना
अंजनगाव सुजी /1 जून- अंजनगाव सुजी शहरात घातक शस्त्रांसह वावरून एखादा भयंकर गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी सिनेमॅटिक पद्धतीने थरारक पाठलाग करून त्यांना शिताफीने जेरबंद केले. गुप्त बातमीदाराने दिलेल्या पक्क्या माहितीवरून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी परतवाडा रस्त्यावरील पद्मश्री उपाहारगृहाजवळ आणि काळेनगर भागात चहूबाजूंनी वेढा घालून आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन धारदार तलवारी, तीन भ्रमणध्वनी आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा एकूण 1 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे शहरात घडणारा एक मोठा अनर्थ टळल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
शहरात काही तरुण पिस्ता रंगाच्या सुझुकी ऍक्सेस दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्याकडे प्राणघातक हत्यारे असल्याची खात्रीशीर खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शोध पथकाने तात्काळ परतवाडा रस्त्यावरील पद्मश्री उपाहारगृहाजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद दुचाकी येताना दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग केला आणि काळेनगर भागात गुन्हेगारांना चहूबाजूंनी घेरून जागीच पकडले. दोन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीर घातक हत्यारे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी शनवारा अंजनगाव सुजी येथील रहिवासी वंश दीपक साहू वय 20 वर्षे याच्याकडून 20 हजार 600 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. विलास नगर अमरावती येथील रहिवासी अनिल मदन सोळंके वय 23 वर्षे याच्याकडून 5 हजार रुपयांचा भ्रमणध्वनी आणि 19 इंचाची धारदार लोखंडी तलवार हस्तगत केली. तसेच आठवडी बाजार परतवाडा येथील रहिवासी अल्केश दीपक पवार वय 21 वर्षे याच्याकडून 45 हजार रुपयांचा महागडा भ्रमणध्वनी आणि एक धारदार तलवार जप्त करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली 80 हजार रुपयांची दुचाकी क्रमांक एमएच 27 ईए 8077 पोलिसांनी जप्त केली आहे. या आरोपींविरुद्ध अंजनगाव सुजी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चांदोरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल पोळ, कर्मचारी जयसिंग चव्हाण, रवी राठोड, अमित घाटे, मोहसिन पठाण, शुभम मारकंडे आणि चालक अक्षय शेळके यांच्या पथकाने चोख बजावली.
पोलिसांचा थरारक छापा-अंजनगाव सुजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे काळेनगर भागात सापळा रचून तीन गुन्हेगारांना शस्त्रांसह पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे आणि तलवारी हस्तगत करण्यात आल्या. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी मुसक्या आवळल्याने शहरातील संभाव्य टोळीयुद्ध आणि मोठी जिवीतहानी टळली असून पोलिसांच्या या सिंहाच्या छातीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




