मनपाची वसुलीपथक व संकुलांमधील गाळ्यांची मुदतीवर आक्षेप
माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख दुटप्पी भूमिकेवर आक्रमक

* पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मनपाची नवी शक्कल
अमरावती / 10 मार्च – महानगरपालिका प्रशासनाने सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर मालमत्ता कराची टांगती तलवार ठेवली असून वसुलीसाठी विशेष पथके घराघरांत धाडण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील शेकडो गाळ्यांची मुदत संपूनही त्यांचे भाडे वाढवण्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर मौन पाळले आहे. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी या दुटप्पी भूमिकेवर कडक ताशेरे ओढले असून गरिबांना लुटून श्रीमंतांचे हित जोपासले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मार्च महिना संपत आल्याने पालिकेची तिजोरी भरण्यासाठी प्रशासनाने जोर लावला आहे. गेल्या काही वर्षांत मालमत्ता करात दोन ते चार पट वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता सक्तीची व सुली केली जात आहे. डॉ. सुनील देशमुख यांच्या मते निवड णुकीत कर कपातीचे आश्वा सन देणारे नेते आता शांत बसून आहेत. शहरातील अनेक व्यापारी संकुलांचे करार संपून पाच वर्षे उलटली तरीही त्यांचे भाडे पुनर्निश्चितीचे काम रखडलेले आहे. प्रशासकीय राजवटीत हे निर्णय घेणे सोपे असतानाही कुणाच्या दबावापोटी हे काम थांबले आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. एकीकडे पालिकेचा खर्च वाढतोय आणि दुसरीकडे हक्काचे उत्पन्न देणारे गाळे जुन्याच दराने सुरू आहेत. यासोबतच शहरातील जुन्या व्यापार्यांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. राज्य शासनाच्या धोरणानुसार लीज नूतनीकरण करण्याची मागणी व्यापार्यांची असताना त्यांना हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचे चित्र आहे. जर व्यापार्यांना न्याय मिळाला नाही तर भविष्यात पालिकेच्या संकुलात कुणीही गुंतवणूक करणार नाही असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
व्यापार्यांची आर्त हाक-अमरावतीतील व्यापार्यांनी आयुष्यभराची पुंजी लावून पालिकेचे बाजार संकुल उभे केले आणि शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. आता राज्य सरकारच्या नियमानुसार हक्काचे नूतनीकरण मागणार्या या छोट्या दुकानदारांना विनाकारण वादात ओढणे चुकीचे असून प्रशासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेणे काळाची गरज आहे.




