जवळापुरात मजूर दाम्पत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला
खाकीने सुरुवातीला फिरवली पाठ; अखेर एसपींच्या ’एन्ट्री’नंतर अॅट्रॉसिटीचा दणका

* पथ्रोट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; विशेष पथकाकडून तपासाचे चक्र फिरले
पथ्रोट / 8 मार्च : अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या जवळापूर गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका गरीब मजूर कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी सपासप वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडणार्या नराधमांनी थेट घरात घुसून दहशत माजवली. या प्रकरणात सुरुवातीला पथ्रोट पोलिसांनी पीडितांची हाक धुडकावून लावत केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी (एसपी) या प्रकरणाची सूत्रे हाती घेताच चित्र पालटले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एका दलित महिलेवर झालेल्या अन्यायाची गंभीर दखल घेत, पोलिसांनी आता थेट ट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या घराला चक्क टाळे ठोकून (सील) पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना ’खाकी’चा इंगा दाखवला आहे.
जवळापूर येथील बाळकृष्ण रामकृष्ण लव्हाळे (50) हे आपल्या घरामध्ये असताना 4 मार्च 2026 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास काळाने घाला घातला. सुरेंद्र वांदे, कुलदीप वांदे, रवी वांदे आणि उज्वला वांदे या चौघांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन बाळकृष्ण यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. कोणताही विचार न करता या संशयितांनी बाळकृष्ण यांच्यावर तुटून पडत त्यांच्या डोक्यावर, छातीवर आणि खांद्यावर गंभीर वार केले. बाळकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना, आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी करुणा बाळकृष्ण लव्हाळे (45) या माऊलीने मध्यस्थी केली. मात्र, क्रूरतेचा कळस गाठत या हल्लेखोरांनी महिलेलाही बेदम मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात आला, ज्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत करुणा लव्हाळे पोलीस ठाण्यात पोहोचल्या, मात्र तेथील स्टेशन डायरी अंमलदारांनी त्यांना दिलासा देण्याऐवजी धाक-दपट करून हाकलून लावल्याचा खळबळजनक आरोप पीडितांनी केला आहे. रक्ताने माखलेले कपडे आणि शरीरावरील जखमांकडे दुर्लक्ष करून केवळ अदखलपात्र (एनसी) गुन्हा नोंदवून पोलिसांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अन्यायाची ही आग शांत न झाल्याने पीडित कुटुंबाने 7 मार्च रोजी थेट अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानंतर दुसर्याच दिवशी, पथ्रोट पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (इछड) 2023 च्या कलम 118(1), 115(2), 333, 292, 324(4), 352, 351(2) व 351(3) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा (ऋखठ 61/2026) दाखल केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अभय आत्माराम चव्हाण यांनी तातडीने जवळापूर गाठून आरोपींच्या घराला सील ठोकले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. सध्या गावात शांतता असली तरी या घटनेने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.
पोलिसांची ’ती’ चूक अन् एसपींचा दणका! -एका बाजूला महिला दिनाचा उत्सव साजरा होत असताना, दुसर्या बाजूला एका दलित महिलेला तक्रारीसाठी वणवण फिरावे लागले. पथ्रोट पोलिसांनी जर वेळेवर दखल घेतली असती, तर हे प्रकरण एवढे चिघळले नसते. आता एसपींच्या हस्तक्षेपानंतर विशेष पथक नेमले गेल्याने दोषी पोलिसांचेही धाबे दणाणले असून, आता कोणाची खैर नाही, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.




