मनपाच्या तिजोरीची चावी कोणाकडे?
महायुतीत रस्सीखेचः आज ठरणार सभापतीचा चेहरा

अमरावती / 5 मार्च – महानगर पालिकेच्या निवडणुकीचा धुराळा उडून आता दीड महिना उलटला असून खर्या अर्थाने सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज 6 फेब्रुवारीला रणसंग्राम होत आहे. महापौर आणि उपमहापौर पदानंतर आता सर्वांचे लक्ष महापालिकेच्या ’तिजोरीची चावी’ कोणाच्या हाती जाते याकडे लागले आहे. महायुतीमध्ये या पदासाठी मोठी चुरस असून भाजप आणि अजित पवार गट आमनेसामने आहेत. आ. संजय खोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा सुरू असून वेळेपर्यंत अंतिम नाव निश्चित होईल. सत्ताधारी महायुतीकडे 16 पैकी 10 सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. यामध्ये भाजपचे 5, युवा स्वाभिमानचे 3 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे 3, एमआयएमचे 2 आणि शिवसेना व बसपा युतीचा 1 सदस्य रिंगणात आहे. महायुतीच्या समझोत्यानुसार भाजपने महापौर आणि युवा स्वाभिमानने उपमहापौर पद घेतले असल्याने आता सभापती पद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समितीमध्ये भाजपच्या वतीने पद्मजा कौंडण्य, स्मिता सूर्यवंशी, मिलिंद बांबल, पंचफुला चव्हाण, विनोद तांदवे तर काँग्रेसकडून ललिता रतावा, अस्मा फिरोज खान, प्रशांत महल्ले यांचा समावेश आहे. युवा स्वाभिमानचे प्रशांत वानखेडे, दीपक साहू सम्राट, प्रियंका पाटोणे तर राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर आणि मिनल सवई नशीब आजमावत आहेत. एमआयएमचे सलाउद्दीन इकरामउद्दीन व नजीम खान आणि शिवसेनेच्या मंजुषा जाधव यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
नंबर गेमचा असा आहे थाट-स्थायी समितीच्या 16 जागांपैकी सत्ताधारी महायुतीकडे 10 जागांचे भक्कम बळ असल्याने त्यांचाच सभापती होणे काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र अंतर्गत वादात कोण बाजी मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भाजपचे सर्वाधिक 25 नगरसेवक सभागृहात निवडून आल्याने त्यांचा दावा मोठा आहे पण युती धर्म पाळताना राष्ट्रवादीची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे




