अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीचा निर्धार

* दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांचे पहिलेच अधिवेशन
* तिन्ही नेत्यांनी मांडली अधिवेशनाची रुपरेषा
मुंबई/22 फेब्रुवारी – विरोधकांनी नुसते हवेत गोळीबार करणे आणि पळून जाणं हे योग्य नाही. विरोधकांनी अधिवेशनात त्यांच्या मनात शंका असलेले सगळे प्रश्न मांडावेत, त्याला सविस्तर उत्तर आम्ही देऊ. विरोधी पक्षांना भरपूर चर्चेची संधी देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी काम करू असं उममुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तर निवडणुकीच्या वेळी ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अजितदादांनी आर्थिक शिस्त कधीही मोडली नाही, त्यांचे कार्य पुढे नेऊ असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.




