पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 2 मर्डर

भातकुलीत 12 वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्त्या

* निष्पाप मुलावर धारदार शस्त्राने वार; एक गंभीर, मृतकाच्या परिवाराचा साडी विक्रीचा व्यवसाय

अमरावती / 25 फेब्रुवारी : भातकुली तालुक्यात बुधवारी रात्री रक्ताचा पाट वाहिला असून एका 12 वर्षीय चिमुरड्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. तालुक्यातील धामोरी ते चेचरवाडी मार्गावरील छाया ढाब्याजवळ असलेल्या पूल क्रमांक दोन जवळ हा रक्ताचा थरार घडला. अज्ञात नराधमांनी केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा जागीच अंत झाला असून, त्याच्यासोबत असलेला 18 वर्षांचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैल दूरवरून आलेल्या एका गरीब कुटुंबावर काळाने हा घाला घातल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या भीषण घटनेने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. जखमी युवकाला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतकाचे देह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे. मूळचे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील सायगड येथील रहिवासी असलेले सुमारे 60-70 परिवार सध्या भातकुलीतील छोगालाल राठी महाविद्यालयाच्या भातकुलीत 12 वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्त्या-मैदानात पालं टाकून वास्तव्यास आहेत. गावोगावी फिरून साड्या विकून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास जिते छल्ला गोंड (ठाकूर) (वय 12) आणि बब्बू बिष्णू आदिवासी गोंड (वय 18) हे दोघे दुचाकी घेऊन शेतशिवारातील पांदण रस्त्याने पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. नराधमांनी 12 वर्षांच्या चिमुरड्या जिते याच्या पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने इतके भीषण वार केले की, त्याचा जागीच जीव गेला. मारेकर्‍यांनी बब्बू यालाही सोडले नाही, त्याच्यावरही शस्त्राने बेदम प्रहार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनेची भीषणता पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच भातकुलीचे ठाणेदार रवींद्र लांजुरकर यांनी तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बब्बूला तातडीने भातकुली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. शांत असलेल्या भातकुली शहरात या घटनेने भीतीचे सावट पसरले आहे. मारेकर्‍यांनी हा हल्ला नेमक्या कोणत्या हेतूने केला? हा प्रकार जुन्या वादातून घडला की लूटमारीच्या प्रयत्नातून? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. भातकुली पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत असून मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
हंबरडा फोडणार्‍या मातेचा आक्रोश-माझी लेकरं फक्त पाणी आणायला गेली होती, त्यांचं कोणाशी काय वैर होतं? असा हृदयद्रावक टाहो फोडत जखमी बब्बूच्या आईने हंबरडा फोडला. रात्रीच्या त्या काळोखात चिमुरड्या जितेचा निर्घृण बळी घेताना मारेकर्‍यांचे हात एकदाही थरथरले नाहीत. पांदण रस्त्यावरील त्या रक्ताच्या खुणा पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. या घटनेमुळे संपूर्ण मजूर छावणीत दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button