आशाताईच्या शोक प्रस्तावात विधानसभा अध्यक्षांकडून उच्चारांची गल्लत
राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले

मुंबई/23 जून-पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली, अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
दीनानाथ मंगेशकरांचे केले ’दीनदयाल उपाध्याय’-राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता आलं नाही, हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? पुढे बोलताना त्यांनी सभागृहातील शोकांतिका मांडली. नार्वेकर हे शोकप्रस्ताव वाचताना चक्क पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख ’दीनदयाल मंगेशकर’ असा करत होते आणि वाट्टेल तसे मराठी वाचत होते. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाल उपाध्याय माहीत आहेत, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तसेच, यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ आमदारांपैकी एकालाही आक्षेप नोंदवावासा वाटला नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
फडणवीस अन् शिंदेंवरही डागली तोफ!-या प्रकरणात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवसांवरही निशाणा साधला. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी गाणी स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात म्हणणार्या फडणवीसांना गांभीर्य समजायला हवं होतं. पण त्यांचं म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होतोय ना? बस झालं. दीनदयाल म्हणो की दीनानाथ चौहान, काय फरक पडतो! अशी उपरोधिक टीका राज यांनी केली.आपल्या भाषेची गळचेपी हिंदी लादून केंद्राकडून सुरू आहे, परप्रांतीयांकडून सुरू आहे आणि आता राज्याच्या विधिमंडळाकडूनही सुरू आहे, याची चीड येते. महाराष्ट्रातील जनतेने आता विचार करावा की आपण काय पद्धतीची माणसं आणि सरकार निवडून देत आहोत, असे आवाहन करत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या बेजबाबदार वृत्तीचा तीव्र निषेध केला आहे.




