भूमिपुत्र कॉलनीत तीन वाहने पेटवली
अज्ञातांच्या कृत्याने परिसरात पसरली मोठी दहशत

वाहने जळून खाक नागरिकांमध्ये तीव्र संताप
अमरावती /23 जून– राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूमिपुत्र कॉलनीत सोमवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी तीन वाहनांना भीषण आग लावून धुमाकूळ घातला. या आगीत एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून इतर दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुना बायपास रोडवरील भूमिपुत्र कॉलनीमध्ये राहणारे पियुष प्रवीण कडू यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने रात्रीच्या वेळी अचानक पेटली. आगीचा भडका इतका मोठा होता की, त्यात एमएच-27/डीके-4330 क्रमांकाची दुचाकी जळून राख झाली. तसेच याच परिसरात उभ्या असलेल्या एमएच-27/ईडी-3523 क्रमांकाची क्टिव्हा आणि एमएच-27/इवाय-3313 क्रमांकाची युनिकॉर्न दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने गंभीररित्या खराब झाली. मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरातील नागरिकांची झोप उडाली. माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही आग कोणीतरी मुद्दाम लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पियुष कडू यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 326 (जी) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हेगारांचा लवकरच शोध लावला जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.




