नियमित योगासने शरिराला देतात नवसंजीवनी
डॉ.रुपेश खडसे यांचे प्रतिपादन

अमरावती/23 जून: अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येणार्या शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी आणि अंकुर होलीनेस फाउंडेशनच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त जवाहर नगर क्रीडा संकुल येथे विशेष आरोग्यदायी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागींना मार्गदर्शन करताना साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ रुपेश खडसे यांनी सांगितले की, दररोज एक तास योगासने केल्यास शरीर सह्याद्रीसारखे कणखर तर मन आणि आत्मा हिमालयाप्रमाणे शांत व स्थिर होतात. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांच्या प्रात्यक्षिकांनी झाली असून त्यानंतर संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाठबागे यांनी योगाचे महत्त्व पटवून देत वृक्षारोपणाच्या मोहिमेवर भर दिला. या प्रसंगी आशा वर्कर संध्या पाटील यांनी आरोग्य जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. आरोग्यासाठी योग व वृक्षारोपण हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक असल्याचे मत प्रमुख पाहुणे डॉ अकिब अहमद यांनी व्यक्त केले. या सोहळ्यात आरोग्य सेविका वैशाली सुरोशे आणि आशा वर्कर संध्या पाटील यांचे नियोजन मोलाचे ठरले. कार्यक्रमात आरोग्य सेवक मनीष हटवार अर्चना बाळस्कर निलेश गाडे अर्चना सालोडकर यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व ए एन एम उपस्थित होते.




