स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा सहन करणार नाही
महापौर श्रीचंद तेजवाणी यांचा इशारा

अमरावती /23 फेब्रुवारी : महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी आज सोमवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी प्रभाग क्र. 6 विलास नगर-मोरबाग परिसरातील हजरत बिलाल नगर, न्यू कॉटन मार्केट रोड, शेगाव, रहाटगाव रोड, के.एल. कॉलेज रोड, मसानगंज, कल्पना नगर व इतवारा बाजार परिसराची स्वच्छतेबाबत पाहणी केली.
पाहणीदरम्यान महापौरांनी स्वच्छता, आरोग्य आणि शिस्तबद्ध प्रशासनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील स्वच्छतेच्या कामात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसून निष्काळजीपणा करणार्या स्वास्थ्य निरीक्षकांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. प्रशासनाला आदेश देताना महापौरांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागातील स्वास्थ्य निरीक्षकांनी दररोज क्षेत्रभेट देणे बंधनकारक राहील. रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि कचरा संकलन केंद्रांवर नियमित स्वच्छता होत आहे की नाही, याची स्वतः पाहणी करून अहवाल सादर करणे आवश्यक राहील. नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास होणार नाही, याची जबाबदारी संबंधित अधिकार्यांचीच असेल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. नगरसेवक किंवा नागरिकांकडून स्वच्छतेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास ती तात्काळ निकाली काढणे बंधनकारक राहील. तक्रारी प्रलंबित ठेवणे किंवा दुर्लक्ष करणे अजिबात सहन केले जाणार नाही. एखाद्या स्वास्थ्य निरीक्षकाविरुद्ध नगरसेवकांकडून तक्रार आल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले. स्वच्छतेच्या मोहिमेत लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत महापौरांनी नागरिकांना कचरा निर्धारित ठिकाणीच टाकण्याचे व स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहन केले. स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेऊन संबंधित स्वास्थ निरीक्षकांना जागेवरच सूचना देण्यात आल्या. अमरावती स्वच्छ, सुंदर आणि निरोगी व्हावी, यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे असे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी सांगितले.महानगरपालिका प्रशासन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध असून स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश महापौरांनी दिला.




