तरूण पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा जपावा

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

* विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात

अमरावती / 19 फेब्रुवारी – शिवरायांच्या संस्कारांची आणि मूल्यांची आजच्या काळात गरज असून तरुण पिढीने शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठएा उत्साहात साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तथा प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, प्रादेशिक कला विभागाचे समन्वयक डॉ. भोजराज चौधरी व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते. कुलगुरू पुढे म्हणाले आजच्या काळात सर्वांना आपल्या हक्कांची जाणीव आहे, परंतू आपण आपल्या जबाबदाया विसरत चाललो आहोत. तरुण पिढीने अमली पदार्थांच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. वाढता स्क्रीन टाईम तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि सहनशीलतेवर विपरीत परिणाम करत आहे. शिवजयंती म्हणजे केवळ रॅली किंवा उत्सव नसून, ती स्वतःच्या भूमिकेचे आणि राष्ट्रभक्तीचे आत्मचिंतन करण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले.
विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शस्त्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्फूर्ती गीत स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, एकपात्री प्रयोग स्पर्धा आणि पोवाडा स्पर्धा अशा उपक्रमांद्वारे शिवरायांचे विचार विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचविल्याबद्दल कुलगुरूंनी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. केवळ उत्सव साजरा न करता, शिवरायांच्या विचारांचा जागर करून आपण समाजासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे आवाहनही कुलगुरूंनी याप्रसंगी केले. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचे वर्णन करताना लिहिलेल्या शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप या ओव्यांचा उल्लेख करत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली. रस्त्यावर न थुंकणे ही आपलीही जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. शिवजयंती केवळ रॅली काढून साजरी न करता, शिवरायांनी दिलेला राष्ट्रभक्तीचा मंत्र अंगीकारून आपण समाजासाठी आणि देशासाठी काय करू शकतो, याचे चिंतन प्रत्येकाने करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्याथ्र्यांना केले.

संबंधित बातम्या

Back to top button