चिखलदर्‍याचे कोळी संग्रहालय पुन्हा सुरू करणार

सुधीर मुनगंटीवार यांचा वनधिकार्‍यांना दणका

अमरावती / 24 मार्च – मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे देशातील पहिले कोळी संग्रहालय बंद पडल्याने माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. चिखलदरा येथील हे वैभव कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुरू करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
निसर्गसंपन्न मेळघाटात आजही कोळ्यांच्या विविध प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात, मात्र अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे या संग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. खुद्द मुनगंटीवार यांनीच 2018 मध्ये या संग्रहालयाचे उद्घाटन केले होते, मात्र आज येथील कोळी नेमके कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने तांत्रिक अडचणी असल्या तरी, या गंभीर विषयावर आपण शासनाकडे जाब विचारणार असून संबंधित अधिकार्‍यांची कानउघाडणी करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. जनतेप्रती जबाबदारी झटकणार्‍या अधिकार्‍यांमुळेच पर्यटन विकासाला खीळ बसत असल्याची टीकाही त्यांनी याप्रसंगी केली.

अधिकार्‍यांच्या बेजबाबदार पणाचा बसला फटका

मेळघाटातील जैवविविधतेचे प्रतीक असलेले हे कोळी संग्रहालय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बंद पडले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अधिवेशनात वेळ कमी असला तरी ते या विषयावर प्रशासनाकडून सविस्तर उत्तर मागवून हे संग्रहालय पुन्हा ताकदीने सुरू करणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button