एसटी चालकास मारहाण भोवली; वरुडच्या आठ जणांना तुरुंगवास

सरकारी कामात अडथळा आणणार्‍यांना न्यायालयाचा दणका

वरूड सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आणि धाडसी निकाल

वरूड/ 5 जानेवारी : राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या एसटी बसच्या चालकावर भररस्त्यात हल्ला चढवणे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे आठ जणांना चांगलेच महागात पडले आहे. वरूड सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आठही आरोपींना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. सन 2016 पासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत अखेर सत्याचा विजय झाला असून, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असाच संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, 4 नोव्हेंबर 2016 रोजी नागपूर आगाराची बस अमरावतीवरून वरूडकडे प्रवासी घेऊन येत होती. दरम्यान, उमरखेड बसथांब्याजवळ बसच्या समोर एक दुचाकी जात असताना, समोरून येणार्‍या एका वेगवान तवेरा वाहन चालकाने बसला हुलकावणी देत कट मारला. एवढ्यावरच न थांबता, त्या वाहन चालकाने खडका फाट्याजवळ आपले वाहन पुन्हा फिरवून आणले आणि बसच्या आडवे लावून रस्ता अडवला. या तवेरा वाहनातून आठ ते नऊ जण खाली उतरले आणि त्यांनी आमच्या गाडीला कट का मारला? असा उलटा आरोप करत बस चालक अझरुद्दीन निजामुद्दीन शेख (रा. वर्धमान नगर, नागपूर) यांना अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या या टोळीने बसच्या काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. या घटनेनंतर बस चालक शेख यांनी तत्काळ बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आणि शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लेहगाव येथून आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान विशाल नारायण कुरवाडे (रा. परसोडा), मंगेश सुभाष ढोमणे, सिद्धार्थ राजेश वाहने, प्रवीण जनार्दन नासरे, सचिन कचरूजी शेंडे, नरेश उकंडराव सोमकुवर, प्रवीण बाबाराव शेंडे, सुनील सुभाष ढोमणे आणि सुदर्शन विठोबा ठाकरे (सर्व रा. लिंगा) या नऊ आरोपींना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांसह तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.वरूड सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी सरकार पक्षातर्फे दमदार युक्तिवाद केला, तर आरोपींच्या वतीने वकील आशिष वानखडे यांनी बाजू मांडली. ठाणेदार विवेक देशमुख आणि पैरवी अंमलदार विवेक हेडाऊ यांनी सर्व साक्षीदारांना वेळेत हजर केले. न्यायमूर्ती ए. ए. पंचभाई यांनी 8 महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून आरोपींना दोषी ठरवले. प्रत्येक आरोपीला तीन महिने साधा कारावास आणि 200 रुपये दंड सुनावण्यात आला आहे. तसेच विविध कलमांखाली प्रत्येकी 15 दिवसांच्या कारावासाची अतिरिक्त शिक्षाही देण्यात आली आहे. या निकालामुळे कायदेशीर प्रक्रियेवर सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
कायद्याचा विजय : गुन्हेगारांचे धाबे दणाणले -मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे निर्णायक ठरले. रस्ते अपघाताचे किंवा वादाचे कारण पुढे करून एसटी कर्मचार्‍यांना लक्ष्य करणार्‍या प्रवृत्तींना या निकालाने चाप बसला आहे. केवळ दंडच नाही, तर प्रत्यक्ष तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने तालुक्यात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button