न्याय व हक्क मिळविण्यासाठी शेतकर्यांना भगतसिंग व्हावे लागेल
बहिरम शेतकरी परीषदेत रवीकांत तुपकर कडाडले

चांदूरबाजार/25 जानेवारी : बहिरम येथे कापूस परिषद व श्रद्धांजली सभा-शेतकरी हक्कांसाठी एल्गार शेती व शेतकर्यांच्या प्रश्नांवर न्याय व हक्क मिळवायचा असेल, तर प्रत्येक शेतकर्याला भगतसिंग व्हावे लागेल, असे परखड मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बहिरम शेतकरी परीषदेत मांडले.
कापूस प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आयोजित कापूस परिषदेत ते बोलत होते. प्रास्ताविकात प्रकाश साबळे यांनी कापूस, तूर तसेच इतर पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत सन्मानजनक व दर्जेदार भाव मिळावा, ही ठाम मागणी मांडली.
24 जानेवारी विदर्भातील तीर्थक्षेत्र बहिरम येथे सन 1975 च्या बहिरम कापूस आंदोलनाच्या रणसंग्रामाचा 51 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी शहीद शेतकरी तसेच बहिरम कापूस आंदोलनाचे नेतृत्व करणार्या सर्व अग्रगण्य नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभा व कापूस परिषदेमध्ये शेकडो शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्हाडाचे पांढरे सोनं मानले जाणारे कापूस, तसेच संत्रा व तूर या मुख्य पिकांना येणार्या खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा, ही एकमुखी मागणी यावेळी मांडण्यात आली. याचबरोबर बहिरम कापूस आंदोलनाचे शेतकरी स्मारक उभारावे, व या सभागृहाला स्व. विठ्ठलराव दुतोंडे सभागृह असे नाव द्यावे,असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मुख्य मार्गदर्शक म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर, विजय विल्हेकर, श्री.जगदीशनाना बोंडे, श्री. गजानन अहमदाबादकर, संजयराव कोल्हे, जानराव पाटील, सुधाकरराव हावरे, मुकुंदराव उभाड, कॉ. पंकज आवारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक शेतकरी नेते प्रकाश साबळे व गोपाल भालेराव होते. याप्रसंगी बहिरम सत्याग्रहातील आंदोलकांच्या परिवारातील जानराव पाटील, सुधाकर हावरे, श्री. निलेश दोतोंडे, विदर्भकुमार बोबडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बहिरम कापुस आंदोलनातीलशहीद शेतकरी स्व. विठ्ठलराव दुतोंडे तसेच बहिरम आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्व. दादासाहेब हावरे, स्व. भाऊसाहेब साबळे, स्व. शंकरराव बोबडे, स्व. मामराज खंडेलवाल, स्व. केशरबाई सिकची, स्व. वामनराव खलोकर, स्व. विनायकराव कोरडे यांना संपूर्ण शेतकरी समाजाच्या वतीने अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर महल्ले, गणेशराव कडू, निलेश उभाड, मनीष हावरे, मंगेश डोंगरे, अक्षय साबळे, कुलदीप विधळे, अक्षय सरोदे, योगेश बोबडे, नंदूभाऊ वैराळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कौस्तुभ आभार प्रदर्शन शेतकरी आंदोलक श्री. गोपाल भालेराव यांनी केले.




