घरगुती गॅससाठी रांगा आणि प्रतीक्षा कायम

बुकिंग करूनही आठवडाभर पुरवठा ठप्पच

* जिल्ह्यात पाच हजार ग्राहकांचे वेटिंग

अमरावती/5एप्रिल– घरगुती गॅस सिलिंडर नोंदणी केल्यानंतर अवघ्या 48 तासांत घरपोच मिळेल, असे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार दिले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विदारक आहे. बुकिंग करूनही 10 ते 12 दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघर कोलमडले आहे. सध्या जिल्ह्यातील गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, सुमारे 5 हजार ग्राहक प्रतीक्षेत आहेत. खाडी देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला आणि वेळेला बसत आहे. एकीकडे गॅसचा तुटवडा असताना दुसरीकडे रॉकेलचा पुरवठाही बंद असल्याने गरिबांचे हाल होत आहेत. सरकारने रॉकेल वाटपाचे धोरण जाहीर केले, कोटाही ठरवला, मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात अद्याप रॉकेलचा साठा पोहोचलेला नाही. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे, कारण एकदा सिलिंडर घेतल्यावर पुढील महिनाभर दुसरे बुकिंग घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. गॅस एजन्सी चालकांकडे भारत गॅसचे 3.30 लाख, इंडियन ऑईलचे 2.67 लाख आणि एचपी गॅसचे 1.61 लाख असे एकूण 7.5 लाख ग्राहक आहेत. मात्र, विस्कळीत पुरवठ्यामुळे एजन्सी चालक आणि ग्राहक यांच्यात दररोज शाब्दिक चकमकी उडत आहेत. प्रशासनाने यावर वेळीच तोडगा न काढल्यास सर्वसामान्यांचा रोष वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button