देशी कट्ट्यासह आरोपीस अटक
शाळेच्या मैदानात पोलिसांची मोठी कारवाई

30 हजार रुपये किमतीचे स्वयंचलित पिस्टल जप्त
अमरावती /5 जानेवारी : शहरात गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असतानाच, नागपुरी गेट पोलिसांनी एका धाडसी कारवाईत अवैध शस्त्र बाळगणार्या एका इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा स्वयंचलित कट्टा आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. संजय उर्फ रामजाने जयप्रकाश श्रिवास (37, रा. यशोदा नगर, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 5 जानेवारी 2026 रोजी शहरातील अकॅडमीक शाळेच्या मैदानात ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष यादव हे वारंट पथकासह परिसरात गस्तीवर असताना त्यांना एका गोपनीय खबर्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली. एका विशिष्ट वर्णनाचा इसम शाळेच्या मैदानात घातक शस्त्र घेऊन फिरत असून, तो एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने मैदानाला वेढा घातला आणि संशयास्पद रित्या वावरणार्या संजय उर्फ रामजाने याला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे लाल रंगाची मूठ असलेले एक घातक स्वयंचलित पिस्टल आणि मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी हे अवैध शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 12/2026, कलम 3, 25 शस्त्र अधिनियम सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणार्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कामगिरी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 1) गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरलागोंडावर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहेमद अली (वारंट पथक प्रमुख), पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष यादव, धैर्यशील कुर्हेकर, पोलीस कॉन्स्टेबल दानिश शेख, राहुल रोडे, किशोर रायकर, सागर पंडित आणि संदीप माकोडे या पथकाने यशस्वी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उरलागोंडावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहेमद अली करत आहेत.




