हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीने भीमा कोरेगावचा इतिहास पुन्हा जिवंत

सायन्सकोरवर समता सैनिक दल व माजी सैनिकांची धगधगती मानवंदना

अमरावती /2 जानेवारी : शौर्य, समता आणि संघर्षाचा एल्गार पुकारत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी अमरावती येथील सायन्सकोर मैदान भीमसैनिकांच्या गर्जनेने दुमदुमून गेले. समता सैनिक दल, माजी सैनिक संघटना आणि हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव विजयाची ज्वाला पुन्हा एकदा पेटली. सायंकाळी ठीक 5:30 वाजता भीमा कोरेगावच्या प्रतिकृती विजयस्तंभास शिस्तबद्ध मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दलाच्या जवानांनी लष्करी शिस्तीत पथसंचलन करत शौर्याची परंपरा जिवंत ठेवली, तर माजी सैनिकांनी राष्ट्रसेवेची आठवण करून देत संघर्षाच्या इतिहासाला नमन केले.
भीमा कोरेगावचा विजय हा केवळ इतिहास नसून अन्याय, जातीय विषमता आणि दडपशाहीविरुद्धचा जिवंत संघर्ष असल्याचा संदेश या मानवंदना कार्यक्रमातून ठळकपणे देण्यात आला. जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.शिस्त, शांतता आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे सायन्सकोर मैदान भीम कोरेगावच्या ऐतिहासिक रणभूमीचेच प्रतिबिंब भासू लागले. नव्या पिढीला संघर्षाची जाणीव करून देणारी ही मानवंदना भीमसैनिकांच्या एकजुटीचे आणि ताकदीचे दर्शन घडवणारी ठरली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, खा. बळवंत वानखडे,माजी प्रधान आयकर आयुक्त सुबचन राम, केंद्रीय आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त अरविंद रामटेके, भदंत चंद्रमणी स्थविर, आरपीआय नेते डॉ. राजेंद्र गवई, वसंतराव गवई, सुरेश कांबळे, राजेंद्र नितनवरे,अरुणकुमार आठवले बन्सी भटकर, अनिल बागडे, मंदाकिनी बागडे, अरविंद सरदार,अतुल रामटेके, सतीश नाईक, रमेश कटके, माजी सैनिक संघटनेचे बी एस. राय, ऍड. सिद्धार्थ शेंडे, कमलेश्वर दाभाडे,सिद्धार्थ बनसोड, रवी नागले, देवेंद्र खांडेकर, भाऊराव दंडाळे, एस यु फुलझेले, पूजा रामटेके,धनंजय गुळदेककर,मालती यावले, शफी सौदागर आदी मान्यवर धम्मपिठावर उपस्थित होते.आयोजन प्रमुख कैलास मोरे यांनी प्रस्ताविकेतून भीमा कोरेगावचा विजय हा शौर्याबरोबरच समतेच्या विचारांचा विजय आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवून संविधान व बाबासाहेबांच्या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठीच या मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी कमलताई गवई यांनी भीमा कोरेगावचा विजय हा शौर्याचा व समतेच्या विचारांचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हेच आपल्या लढ्याचे शस्त्र आहे. आज हजारो भीमसैनिकांनी दिलेली मानवंदना ही अन्यायाविरुद्धच्या एकजुटीची साक्ष आहे.हा संघर्षाचा वारसा नव्या पिढीने जपणे हीच खरी मानवंदना ठरेल असे प्रतिपादन केले तर खा. बळवंत वानखडे म्हणाले की,समता सैनिक दल, माजी सैनिक आणि हजारो भीमसैनिकांनी दिलेली मानवंदना ही संविधानावरील अढळ निष्ठा दर्शवत असल्याचे मत व्यक्त केले.बाबासाहेबांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांसाठी एकजुटीने लढण्याची हीच खरी प्रेरणा आहे. हा इतिहास जपणे आणि पुढे नेणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले. विशेष अतिथी म्हणून लाभलेले सुबचन राम यांनी आपल्या भाषणात तीव्र शब्दांत टीका करताना म्हटले की, आज संविधान डोक्यावर ठेवण्याचे नाटक करणारी, पण प्रत्यक्षात संविधान पायाखाली तुडवणारी एक जमात अस्तित्वात आहे. संविधान दाखवूनच संविधानाची धिंडवडे काढण्याचे काम काही लोक करत असून, अशा प्रवृत्तींची खरी ओळख जनतेसमोर उघड करण्याची ताकद या भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमातून मिळते. समता, न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याची हीच वेळ आहे, असेही त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले.भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमानंतर सायन्सकोर मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाने भीमसैनिकांच्या उत्साहाला नवे बळ दिले. शिंदेशाही गायक राहुल शिंदे, होममिनिस्टर फेम अभिजित राजे, गायक राहुल तायडे भीमगीतांनी उपस्थितांना इतिहासाची आणि संघर्षाची आठवण करून दिली, तसेच ‘जयभीम कडक’ रॅपर विपीन तातड यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. सशक्त सादरीकरणाने युवकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. यावेळी जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button