अमरावती विभागातील 20 महाविद्यालये बोगस
शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून यादी जाहीर

छ. संभाजीनगर विभाग प्रथम क्रमांकावर;
शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
अमरावती/12 जुलै – स्थानिक अमरावती विभागातील शैक्षणिक क्षेत्रात एकच मोठी खळबळ उडाली असून विभागामध्ये तब्बल 20 महाविद्यालये कोणतीही पूर्वपरवानगी आणि आवश्यक पायाभूत सुविधा नसताना राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या, पात्र शिक्षक, प्रयोगशाळा आणि साधे ग्रंथालयसुद्धा उपलब्ध नाही. शासन निर्णयानुसार आवश्यक असलेल्या अनिवार्य अटी व शर्तींची पूर्णपणे पायमल्ली करून विद्यार्थ्यांच्या
भविष्याशी खेळणार्या अमरावती विभागातील या 20 बोगस शिक्षण संस्थांवर शासनाकडून आता मान्यता रद्द करण्याची कडक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. विधान परिषदेत भाजपचे सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील बोगस महाविद्यालयांची यादी जाहीर केली. यामध्ये अमरावती विभागाचा आकडा अत्यंत मोठा असून तब्बल 20 महाविद्यालये दोषी आढळली आहेत. या महाविद्यालयांनी विद्यापीठ कायद्यातील नियमांना केराची टोपली दाखवत आपले दुकान थाटले होते, याकडे लोकप्रतिनिधींनी सभागृहाचे लक्ष वेधले.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील कलम 108 अन्वये महाविद्यालयांचे संलग्नीकरण आणि मान्यतेसाठी कडक अटी
विहित करण्यात आल्या आहेत. तरीही अमरावती विभागातील या संस्थांनी आवश्यक भौतिक सुविधा उभारल्या नाहीत. आता कलम 117 अन्वये या संस्थांची तपासणी करून कलम 120 नुसार त्यांची मान्यता कायमची काढून घेण्याची प्रशासकीय प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. यामुळे विभागातील बोगस संस्था चालकांचे धाबे दणाणले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.




