लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर पेट्रोल ओतले

जुनी तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीची तरुणीशी झटापट

तिवसा तालुक्यातील कुर्‍हा पोलिसात गुन्हा दाखल

अमरावती /12 जुलै- लग्नास स्पष्ट नकार देत पोलिसातील जुनी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एका 19 वर्षीय तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना तिवसा तालुक्यातील कुर्‍हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 11 जुलै रोजी दुपारी घडली. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडितेने आरडाओरडा केल्याने तिचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी कुर्‍हा पोलिसांनी आरोपी प्रतीक विलास ताठे वय 25 वर्ष राहणार महेंद्र कॉलनी अमरावती याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गंभीर गुन्हा शनिवारी रात्री दाखल केला आहे. पीडित तरुणीचे आई-वडील आणि मोठे वडील लग्नासाठी बाहेरगावी गेले होते आणि भाऊसुद्ध घराबाहेर होता. तरुणी घरात एकटीच कपडे धुवत असताना आरोपी प्रतीक ताठे तिथे आला. त्याने तरुणीला जुनी
केस मागे घेण्याची आणि लग्न करण्याची धमकी दिली. तरुणीने लग्नाला आणि केस मागे घेण्यास ठाम नकार दिला. याचा राग
येऊन आरोपीने तिलाजबरदस्तीने पकडले. या झटापटीत तरुणीचे कपडे फाटले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोबत आणलेली पेट्रोलची बाटली काढून तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडेपेटीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून शेजारी आणि चुलत भाऊ धावून आले. लोकांना येताना
पाहून आरोपी प्रतीक ताठे याने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपीवर आधीही गुन्हे दाखल असून पोलिस उपनिरीक्षक आशिष झिमटे पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button