जागावाटपात भाजपने फसवणूक केली

मुंबई /31 डिसेंबर : राज्यात 29 महापालिकांचा महासंग्राम सुरू आहे. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत भाजप- शिवसेना यां च्यात चर्चा सुरू होत्या. त्यामुळे 16 महापालिकां मध्ये भाजप-शिवसेनेची युती झाली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या मनात याबद्दल प्रचंड खदखद आहे. त्यांच्याकडून वारंवार यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशेषता संजय शिरसाट यांनी भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय, अशी घोषणा केली होती. अशातच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना यांच्यात युती करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे चर्चेच्या फेर्या सुरू झाल्या होत्या. मात्र, दोन्ही बाजूंनी जागांवर अडून बसल्याने भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपाचे गाडे पुढे सरकत नव्हते. मिरा भाईंदर महापालिकेत तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नव्हता. तिथे चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानिक नेत्यांशीही चर्चा करूनही जागावाटप होत नव्हते. त्यामुळे भाजपच्या अहंकारामुळे युती तोडत आहोत, असे जाहीर करत संजय शिरसाट यांनी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. तर मिरा भाईंदरमध्ये चर्चा पुढे सरकत नव्हती तसेच भाजपकडून प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहून प्रताप सरनाईक यांनी भाजपला 24 तासांत निर्णय घेण्याचाही इशारा दिला होता. मात्र, याचा काहीही फरक पडला नाही. अखेर युती झालीच नाही. त्यामुळे मिरा भाईंदर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची फसवणूक झाली, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी आज (31 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केला.




