नेत्रदानातून अमर झाल्या स्व.बीनाबेन पोपट

दुःखाच्या क्षणी पोपट परिवाराचा मानवतेला महान संदेश

अमरावती/17 मे : येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक व समाजसेवक चंद्रकांत पोपट यांच्या धर्मपत्नी बिनाबेन यांचे दीर्घ आजाराने अकाली निधन झाले, परंतु या अथांग दुःखातही पोपट परिवाराने त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदानाचा एक अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. या पवित्र कार्यामुळे दोन गरजू अंध व्यक्तींच्या आयुष्यात नवीन प्रकाशाची पहाट उजाडणार आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही सामाजिक भान जपणारा हा निर्णय संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ ठरला आहे. शहरातील ’रघुवीर गोडबोले आणि नमकीन’ तसेच ’संगीत साधना गायन क्लब’चे संचालक चंद्रकांत पोपट यांच्या पत्नी बिनाबेन यांचे 14 मे 2026 रोजी निधन झाले. त्या अत्यंत मनमिळाऊ, कुटुंबाप्रती समर्पित आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रसेर असणार्‍या माऊली होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण अमरावती शहरात मोठी शोककळा पसरली. अशा कठीण प्रसंगातही ग्रामीण भागातील मातीचा आणि संस्कृतीचा वारसा जपत, ’मरणोत्तर नेत्रदान’ करण्याचा निर्णय परिवाराने घेतला. ’हरिणा नेत्रदान समिती’च्या मदतीने ही प्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर पवार आणि समुपदेशक निलेश ढेंगळे यांनी कायदेशीर आणि वैद्यकीय नियमांनुसार अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केली. या अत्यंत भावुक क्षणी समितीचे अध्यक्ष मनोज राठी, रामप्रकाश गिल्डा, डॉक्टर नंदकिशोर लोहाणा, प्राध्यापक मुकेश लोहिया, मोनिका उमक, सुरेंद्र पोपली, शरणपाल अरोरा, सुरेश वसाणी, मनीष सांवला, देवेश डेम्बला आणि देवल मानसत्ता यांच्यासह समितीचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी पोपट परिवाराच्या या त्यागाचे आणि संवेदनशीलतेचे मनापासून कौतुक केले. निधनाच्या या दुःखद प्रसंगात दिवंगत बिनाबेन यांचे पती चंद्रकांत पोपट, मुलगा तेजस पोपट, सून आदिती पोपट, मुलगी यशस्वी माधानी आणि जावई राहुल माधानी यांच्यासह दिलीपभाई पोपट, नरेशभाई पोपट, निलेशभाई पोपट, जयंतीभाई पोपट, प्रियेश पोपट, नितीन पोपट, शिवाभाई पोपट, गोपाळभाई पोपट, रोहनभाई पोपट, मोहित पोपट, धवल पोपट, कपिल पोपट, निहाल पोपट आणि माधव पोपट यांच्यासह संपूर्ण पोपट परिवार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृत्यू हा शेवट नसून त्यातून कोणाचे तरी आयुष्य उजळू शकते, हाच संदेश या कार्यातून मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button