108 रुग्णवाहिकेची राज्यातील 1 कोटी 14 लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

अमरावती /10 डिसेंबर : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची 108 रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग 11 वर्षांपासून डायल 108 रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे 1 कोटी 14 लाख 47 हजार 296 रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.
सद्यस्थितीत राज्यात एकूण 937 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस.) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस.) रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, वैद्यकीय ऑक्सिजन यंत्रणा आदी सुविधांचा समावेश आहे. देशातील 24 तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव सेवा आहे.
राज्यात 5 डिसेंबरपर्यंत अपघाती घटनांमध्ये 108 रुग्णवाहिकेमधून 5,44,224 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर आगीच्या घटनांतील 31,927, हृदयरोगातील 1,03,889, उंचावरून पडून जखमी झालेल्या 1,59,551, विषबाधेच्या 2,67,474, प्रसूतीवेळीच्या 17,96,655 आणि शॉक/वीज पडून जखमी झालेल्या 7,399 रुग्णांना सेवा देण्यात आली.अशा प्रकारे राज्यात 108 सेवेमार्फत एकूण 1 कोटी 14 लाख 58 हजार 316 रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यात यश आले आहे.विदर्भातील गोंडवाना विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या विभागातील 1 लाख 38 हजार 665 नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.




