48 तासात यवतमाळ जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू

उष्माघातानं बळी गेल्याचे अंदाज

यवतमाळ/24 मे– राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 ते 45 अंशावर गेला आहे. यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्णलहरी सुरु असताना गेल्या 48 तासात आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दिग्रस येथे चोवीस तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती. यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसद मध्ये दोन तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत. बाभुळगांवच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावर पुलाखालीमारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तर पुसदच्या हनुमान वॉर्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कुलर मध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, रूग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पुसदच्याच नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून, भर उन्हात बाहेर पडणार्‍या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

संबंधित बातम्या

Back to top button