विदर्भातील शाळा 29 जूनला
शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

वर्धा /8 जून –यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणार्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता.
जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली. डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून विदर्भातील सध्याच्या हवामानाची परिस्थिती आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम अधोरेखित केला. लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने उष्माघात, निर्जलीकरण, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा तसेच इतर उष्णताजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे थंड पाणी,सावलीची व्यवस्था किंवा उष्णतेपासून संरक्षणाची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावर्षी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. हवामानातील बदल आणि विलंबाने होणारे पावसाचे आगमन यामुळे उष्णतेचा कालावधी अधिक लांबला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विदर्भातील शाळा 29 जून पासून सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे मान्य केले.
शिक्षक संघटना व पालकांकडून शाळा सुरू होण्याची तारीख वाढविण्याबाबत मागील काही दिवसांपासून मागणी होत होती. शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळा सुरू करण्याची तारीख वाढविण्यासाठी घेतलेल्या संवेदनशील भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.




