नांदगाव पेठेत युवकाची हत्या; एक गंभीर

दुचाकीचा धक्का लागल्याने थरारक घटना

पोलिसांनी अवघ्या 25 मिनिटांत आरोपींना ठोकल्या बेड्या

नांदगांव पेठ / 11 फेब्रुवारी : औद्योगिक वसाहतीचे केंद्र असलेल्या नांदगाव पेठ परिसरात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादातून तीन तरुणांनी दोन सख्ख्या भावांना रस्त्यात गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी रानटी हल्ला चढवला. या रक्तरंजित संघर्षात 33 वर्षीय गौरव सुधाकरराव घोटेकार याचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर त्याचा धाकटा भाऊ सौरभ सुधाकरराव घोटेकार रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला. भरवस्तीत झालेल्या या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूळचे अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असलेले गौरव आणि सौरभ हे दोघेही नांदगाव पेठ येथील एका नामांकित वस्त्रोद्योग कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सौरभ गेल्या आठ वर्षांपासून या कंपनीत स्थिरावला होता, तर त्याचा मोठा भाऊ गौरव हा अवघ्या आठ दिवसांपूर्वीच नवीन स्वप्ने घेऊन नोकरीवर रुजू झाला होता. बुधवारी सायंकाळी कामावरून सुटी झाल्यानंतर दोन्ही भावांनी महामार्गावरील ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर मेडिकलमधून औषधे घेऊन ते नमन विहार येथील आपल्या घराकडे दुचाकीने जात होते. दोघे भाऊ नांदगाव पेठ बस स्थानक परिसरात पोहोचले असता, समोरून येणार्‍या एका दुचाकीशी त्यांच्या दुचाकीचा किरकोळ स्पर्श झाला. ही बाब इतकी नगण्य होती की ती साध्या माफीने मिटू शकली असती. मात्र, समोरच्या दुचाकीवर स्वार असलेल्या तीन तरुणांच्या डोक्यात जणू सैतान संचारला होता. त्यांनी शिवीगाळ करत वाद उकरून काढला आणि काही क्षणातच कमरेला खोचलेली धारदार शस्त्रे उपसली. काही कळण्यापूर्वीच त्यांनी गौरववर हल्ला चढवला. गौरवच्या दोन्ही पायांवर सातवेळा सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना आपला भाऊ मरणाच्या दारात असल्याचे पाहून सौरभ त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला, मात्र निर्दयी आरोपींनी त्याच्यावरही हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. भररस्त्यात हा रक्ताचा खेळ सुरू असताना परिसरातील नागरिक सुन्न झाले होते. एका धाडसी रिक्षाचालकाने जखमी अवस्थेतील दोन्ही भावांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले, मात्र उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच गौरवची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या 25 मिनिटांत पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून पळून जाणार्‍या तिन्ही मारेकर्‍यांना जेरबंद केले.

25 मिनिटांत मारेकर्‍यांना अटक

हत्या केल्यानंतर आरोपी आदेश रघुनाथ तेलमोरे (25), रोहित संजय तायडे (23) आणि यशोदीप विनायक वेलकर (तिघेही रा. महादेव खोरी, अमरावती) हे वाळकी रस्त्याने पळून जात होते. मात्र, नांदगाव पेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने नाकाबंदी करत या नराधमांच्या मुसक्या आवळल्या. किरकोळ वादातून कोणाचे तरी घर उद्ध्वस्त करणार्‍या या गुंडांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button