स्नेहसंमेलन हे कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात तरुणाईचा जल्लोष

* विलास इंगोले यांचे प्रतिपादन
* स्नेहसंमेलनात विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
अमरावती /25 फेब्रुवारी – श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठआहे असे प्रतिपादन मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांची रंगतदार मेजवानी पाहायला मिळाली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विलास भाऊ इंगोले (अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते) तसेच ड.सुनील देशमुख (बारा असोसिएशनचे अध्यक्ष), प्राचार्य ढोबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख ह्या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ.रामटेके,प्रा.उदय ठाकरे, प्रा.डॉ.राजेश पाटील यांची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, नाट्यछटा, एकांकिका आणि लोककलेच्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख अतिथी विलास इंगोले आणि सुनील देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे व आयोजन कौशल्याचे कौतुक करत शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा आणि उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विविध पारितोषिके देऊन त्यांना गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने अतिथींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धार्थ भोयर,जाज्जी ओबेरॉय, व राधिका ठाकरे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल घवळे यांनी केले. स्नेहसंमेलनामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास आणि आनंद हा कार्यक्रमाच्या यशाची साक्ष देणारा ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




