चौराकुंड गावात वन कर्मचार्‍यावर ग्रामस्थांचा हल्ला; दोन जखमी

मेळघाटात वन्यप्राण्यांच्या शिकारीवरून मोठा राडा

पाणवठ्यातील विषबाधेमुळे निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी

ग्रामस्थांची वनविभागावर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

दगडफेक करणार्‍याला अटक; गावात तणाव

अमरावती/31मे- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत धारणी तालुक्यातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात पाणवठ्यामध्ये युरिया विष कालवून चार रानगवे, दोन भेकडी आणि मोरांसह अनेक पक्षांची निर्घृण शिकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपी युवकाला वनविभागाने अटक केल्याच्या रागातून ग्रामस्थांनी वन कर्मचार्‍यांवर अचानक हिंसक हल्ला चढवला. या भीषण दगडफेकीत एक महिला आणि एक पुरुष असे दोन वनरक्षक गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे संपूर्ण मेळघाट परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात उद्भवलेली गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी धारणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
मेळघाटातील चौराकुंड वनपरिक्षेत्रातील एका नैसर्गिक पाणवठ्यावर विषारी पाणी प्यायल्यामुळे चार रानगवे, दोन भेकडी आणि मोरांसह इतर पक्षी मृतावस्थेत आढळल्याचे खळबळजनक प्रकरण 22 मे रोजी समोर आले होते. वनविभागाने या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, जंगलातील प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानेच नैसर्गिक पाणवठ्यात मोठ्या प्रमाणावर युरिया विष कालविल्याचे निष्पन्न झाले. या अघोरी कृत्या प्रकरणी वनविभागाने कारवाई करत चौराकुंड येथील एका स्थानिक युवकाला वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अटक केली. गावातील तरुणाला अटक झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच गावकर्‍यांमध्ये वनविभागाविरुद्ध तीव्र असंतोष आणि रोष निर्माण झाला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गावातील आणखी सहा संशयित युवकांना वनविभागाने चौकशीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत, मात्र अटकेच्या भीतीने हे सर्व जण सध्या फरार झाले आहेत.
शनिवारी रात्री वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या संपूर्ण शिकारीच्या प्रकरणाची गावात आणि परिसरात सखोल चौकशी करत असतानाच, अचानक संतप्त गावकर्‍यांनी वन कर्मचार्‍यांच्या दिशेने बेधुंद दगडफेक सुरू केली. या हल्ल्यामध्ये कर्तव्यावर असलेले एक महिला वनरक्षक आणि एक पुरुष वनरक्षक दगडांचा मार लागल्याने रक्ताळले आणि गंभीर जखमी झाले. गावकर्‍यांचा आक्रमक पवित्रा पाहून संपूर्ण चौराकुंड परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रचंड दहशत पसरली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन धारणी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत जखमी झालेल्या दोन्ही वनरक्षकांना तात्काळ उपचारासाठी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वनविभागाने या संपूर्ण हल्ल्याची घटना अतिशय गांभीर्याने घेतली असून वरिष्ठ वन अधिकारी चौराकुंड गावाच्या परिघातील आणि जंगलातील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
पाशवी शिकार आणि पोलिसांची कारवाई-जंगलातील पाणवठ्यात युरिया विष कालवून चार रानगवे आणि पक्षांची शिकार करणार्‍या मुख्य आरोपीला वनविभागाने बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे संतप्त नातेवाईक आणि अल्पवयीन मुलांनी वनरक्षकांवर प्राणघातक दगडफेक केली. या हल्ल्यातील एका आरोपीला धारणी पोलिसांनी अटक केली असून, गावात चोख पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे सध्या शांतता आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button