नेर पिंगळाईच्या शाळेचाही होणार कायापालट
478 जिल्हा परिषद शाळांपैकी जिल्ह्यातील 11 शाळांची निवड

* सरकारी शाळेचा कायापालट आता नव्या रूपाने
* गावकर्यांचा विश्वास अन् शिक्षकांचा ध्यास ठरला खास
नेर पिंगळाई / 29 मार्च : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील 478 जिल्हा परिषद शाळांना ’डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून अधिकृत मान्यता दिली असून, यामध्ये अमरावती जिल्ह्यातून 11 पैकी मोर्शी तालुक्यातील चार शाळांनी आपला ठसा उमटवला आहे. या मानाच्या यादीत मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील ’जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा’ या शाळेने स्थान मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, शाळा व्यवस्थापन समितीची साथ आणि ग्रामपंचायतीचे पाठबळ या त्रिवेणी संगमामुळेच या शाळेचा कायापालट झाला असून, आज ही शाळा खाजगी शाळांनाही मोठी टक्कर देत आहे.
शाळेचा हा प्रवास सोपा नव्हता, मात्र येथील शिक्षक वृंदाने आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी चिकाटीने शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिवस-रात्र एक केली. आज या शाळेत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय असून, सुरक्षेसाठी सर्वत्र चित्रफीत नोंदणी यंत्रणा बसवण्यात आली आहे. मुलांच्या आधुनिक शिक्षणासाठी संगणकीय वर्ग आणि संगणकीय चर्चा कक्ष अशा प्रगत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केवळ अभ्यासातच नव्हं, तर खेळाच्या मैदानातही येथील मुले जोमाने चमकत आहेत. शाळेकडे स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण असून खेळाचे अद्ययावत साहित्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वेगवेगळ्या विषयांवरील स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेतील मुलांनी नेहमीच आघाडी घेतली आहे. या यशाचे खरे गमक म्हणजे येथील अनुभवी आणि मनमिळावू शिक्षक वर्ग होय. शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. या प्रक्रियेत गावातील पालकांचा आणि सुशिक्षित नागरिकांचा शाळेवर असलेला अतूट विश्वास हीच मोठी ताकद ठरली. ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांत मोठी भर पडली. अशा प्रकारे लोकसहभाग आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे नेर पिंगळाईची ही शाळा जिल्ह्यासाठी एक दीपस्तंभ ठरली असून, ग्रामीण भागातील शिक्षणाची ही यशस्वी वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शाळेचे वैभव आणि खास वैशिष्ट्ये-नेर पिंगळाईच्या या शाळेत आता संगणकीय शिक्षणासोबतच खेळाचे आधुनिक साहित्य उपलब्ध झाले आहे. सुरक्षिततेसाठी चित्रफीत नोंदणी यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता राज्यस्तरावर चमकत आहे.




