नवनियुक्त महापौर, उपमहापौर यांच्यापुढे असणार नवे आव्हान

शहरातील कचरा स्वच्छता बनला आहे कळीचा मुद्दा

* लोकनियुक्त पदाधिकार्‍यांच्या कामांचे होणार मूल्यमापन

अमरावती / 6 फेब्रुवारी – महानगर पालिकेत गेल्या 4 वर्षापासून असलेल्या प्रशासकराज आता संपले आहे. तर शुक्रवारला नवनियुक्त महायुतीचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि युवा स्वाभिमानचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी पदभार स्विकारला. मात्र गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकराज मध्ये मनपाच्या कारभारावर अनेकवेळा प्रश्नचिन्ह लागले होते. तर शहरातील कचरा व्यवस्थापन, क्युआर कोडींग पध्दत आणि वादग्रस्त घनकचरा व्यवस्थापाचा 13 कोटीचे कंत्राटही वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. आता प्रशासक राज संपुष्टात येवून नव्या कारभार्‍यांनी पदभार स्विकारला असला तरी गेल्या 4 वर्षात यंत्रणेच्या अंगवळणी पडलेल्या कारभारात सुधारणा करण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त महापौर व उपमहापौर यांच्यापुढे असणार आहे. गेल्या 4 वर्षात प्रशासकराज मध्ये 4 वेगवेगळे आयुक्त कार्यरत होते. त्यामध्ये प्रविण आष्टीकर, देविदास पवार, सचिन कलंत्री व एकदिवसासाठी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणारे कापडणीस यांचा समावेश असून देवीदास पवार यांनी परत दुसर्‍यांदा आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर आयुक्तपदी सौम्या शर्मा- चांडक यांनी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली. आता नविन कारभारी आल्यानंतरही आयुक्त म्हणून सौम्या शर्मा याच कायम आहेत. तर विरोधी पक्षातील निवडून आलेले अनेक नगरसेवक यांना महानगरपालिकेच्या प्रशासनाचा दिर्घ अनुभव आहे. त्यामूळे सभागृहात कामकाज करतांना हे वरीष्ठ नगरसेवकांची कारभारावर करडी नजर असणार आहे. त्यामूळे साहाजिकच आमसभेत खडाजंगी होण्याचीही प्रसंग निश्चितपणे निर्माण होतील. अश्या प्रसंगी महापौर व उपमहापौर नेमकी कोणती भूमिका घेतील, त्यातून कसा मार्ग काढतील हा आता येणारा काळच ठरवणार आहे. एकीकडे 4 वर्षामध्ये मनपा प्रशासनाची यंत्रणेला मेरी मर्जी कारभार करण्याची सवय असल्यामूळे आता ते नवनियुक्त महापौर व उपमहापौर आणि नगरसेवक यांच्या अपेक्षा पूर्ण करतील काय हा ही एक औत्सुक्याचा विषय असणार आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांची कामगिरी दमदार असल्याचे अनेकदा दिसून आले. 19 जुन 2025 रोजी त्यांनी पदभार स्विकारला त्यानंतर एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्या कामाची अनेकवेळा चुणुक दिसून आली.
महानगरपालिकेत आता शहरातील कचरा स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या विभागाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्यांवर आता आमसभेत कोणते निर्णय होतील. तसेच नवनियुक्त नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासासाठी निधी जास्त मिळावा यासाठीही साहाजिकच प्रयत्न करतील. तर मनपाची आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी सक्षम नसल्यामुळे सत्ताधारी व विरोधी बाकावरील नगरसेवकांना निधीचे वितरण करतांना संघर्ष होणार हे तर स्पष्टच आहे. कारण हे सर्व नगरसेवक जनतेनी निवडून दिलेले आहेत. निवडणूकीत त्यांनी अनेक आश्वासने दिली आहेत आणि ती आश्वासने पुर्ण करणे त्यांच्या पुढील राजकीय भविष्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक विकासनिधी मागतांना त्यांच्यावर अन्याय झाला तर गप्प बसणार नाही अश्या कसोटीच्या प्रसंगात कसा मार्ग काढता येईल हे एक मोठे आव्हानच ठरणार आहे.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची कारभारावर उमटली मोहर

प्रशासक काळात 5 आयुक्तांनी मनपाचा कारभार सांभाळला आहे तर देविदास पवार हे दोनवेळा आयुक्त पदावर कार्यरत होते. तर 19 जुन 2025 रोजी आयुक्त पदावर सौम्या शर्मा चांडक आरुढ झाल्या. एक कर्तव्यदक्ष महीला अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. त्यांच्या कार्यकाळात मनपाला विविध पुरस्कार सुध्दा मिळाले आहेत. शिस्तप्रिय आणि नागरीकांशी थेट संवाद हे त्यांच्या कारभाराचे आजवर वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामूळे आता महापौर व उपमहापौर पदावर आरुढ झाल्यानंतर मनपाच्या कारभारात कशी परीणामकारक सांगड घालणार हे ही आता दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button