रिल्सच्या नादात पोलिसांचा इंगा

हातात सुरा घेऊन दहशत पसरवणारे तरुण गजाआड

* वडाळी बागेत रिल्स बनवताना गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

अमरावती / 25 फेब्रुवारी : आजकालच्या पोरांना रिल्सचं वेड एवढं लागलंय की, त्या पायी ते काय करतील याचा नेम नाही. हातात धारदार शस्त्रं घेऊन आणि चेहर्‍यावर दहशतीचे भाव आणून सोशल मीडियावर रिल्स गाजवणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. अमरावती शहराच्या गुन्हे शाखेने या ’रिल्स बहाद्दरांचा’ चांगलाच माज उतरवला असून, त्यांना शस्त्रांसह बेड्या ठोकल्या आहेत.
गुन्हे शाखेला गुप्त बातमी मिळाली होती की, काही मुलं गेल्या काही दिवसांपासून हातात शस्त्रं घेऊन रिल्स बनवत आहेत आणि ती समाजमाध्यमांवर प्रसारित करून लोकांमध्ये भीती पसरवत आहेत. आज 25 फेब्रुवारी 2026 रोजी हे दोन्ही तरुण वडाळी बागेच्या परिसरात पुन्हा एकदा असाच काहीतरी स्टंट करण्याच्या तयारीत उभे होते. मात्र, त्याआधीच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे लोकेश राजेश वाटकर (वय 19, रा. दत्तवाडी, महाजनपुरा) तसेच राम राजू तायडे (वय 21, कुंभारवाडा, खोलपुरी गेट) अशी आहेत. पोलिसांनी जेव्हा त्यांची झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे लोखंडी चाकू आणि स्टीलचा चायना चाकू अशी दोन घातक शस्त्रे मिळून आली. या दोघांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे तरुण हातामध्ये धारदार चाकू घेऊन व्हिडिओ बनवत होते. वडाळी बागेत हे लोक दहशत माजवण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांचा खेळ खल्लास केला. दोन हजार रुपये किमतीची दोन शस्त्रे जप्त करण्यात आली असून, आता या पोरांना पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button