12 वर्षांय चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा

सख्ख्या मावस भावानेच केली भावाची हत्या, अपघाताचा खोटा बनाव रचून सत्य दडपण्याचा प्रयत्न

अमरावती /26 फेब्रुवारी : दारूची भीषण नशा आणि किरकोळ घरगुती वादाचे पर्यवसान एका 12 वर्षांच्या कोवळ्या जिवाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना भातकुली येथे घडली आहे. सख्ख्या 22 वर्षीय मावस भावानेच रागाच्या भरात धारदार चाकूने सपासप वार करून जितो छल्ला गोंड या निष्पाप बालकाचा काटा काढला. भातकुली येथील छोगालाल राठी महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी रात्री हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. विशेष म्हणजे या हत्येला अपघाताचे गोंडस रूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा नातेवाईकांचा डाव गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत उधळला गेला असून या भीषण गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. मूळचे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील सायगड येथील रहिवासी असलेली आणि गावोगावी साड्या विकण्याचा व्यवसाय करणारी सुमारे 60 ते 70 कुटुंबे सध्या भातकुली परिसरात तंबू ठोकून वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री जितोचे वडील दारूच्या नशेत धुंद होऊन घरी परतले आणि जेवण वाढण्यावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. हा वाद विकोपाला जात असतानाच जितोचा मावस भाऊ बब्बू विष्णू आदिवासी गोंड (22) तिथे पोहोचला. आपल्या वडिलांशी बब्बूचे भांडण होत असल्याचे पाहून लहानगा जितो संतापला आणि त्याने रागाच्या भरात जवळच असलेला चाकू उचलून बब्बूच्या पोटावर वार केला. या अनपेक्षित हल्ल्याने बब्बूचा संयम सुटला आणि त्याने तोच चाकू हिसकावून घेत जितोच्या पाठीवर व गुप्तांगावर एकामागून एक सपासप वार केले. वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जितोचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
घटनेनंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांपासून हे पाप लपवण्यासाठी मोठा बनाव रचला. दोघेही दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मात्र गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे अपघाताचे कोणतेही निशाण दिसले नाही. जमिनीवर सांडलेले रक्त आणि शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच नातेवाईकांचे अवसान गळाले आणि त्यांनी या क्रूर कृत्याची कबुली दिली. सध्या आरोपी बब्बू जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
नातेवाईकांनी रचलेले खोटे ’नाट्य’ पडले फिके-घटनेनंतर नातेवाईकांनी मृत जितो आणि जखमी बब्बू हे शेतातून पाणी आणायला गेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याची बनावट कथा रचली होती. भातकुली उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयातही त्यांनी हाच बनाव सुरू ठेवला होता. मात्र डॉक्टरांचा संशय आणि गुन्हे शाखेच्या चोख तपासामुळे हा हत्येचा कट उघड झाला. गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button