पेपर फुटीत हातभार लावणार्यांचे हात छाटायला हवे!
आ.बच्चू कडूंचे धक्कादायक विधान

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्यांना कठोर शिक्षा करा
अमरावती /24 मे– वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत म्हणजेच ’नीट’मध्ये झालेल्या महाघोटाळ्यामुळे आणि पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांचे चालक, प्राध्यापक आणि दलालांना या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या असून, यावरून सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आ. बच्चू कडू यांनी कमालीचा संताप व्यक्त केला आहे. परीक्षेसाठी दिवस-रात्र एक करून रक्ताचे पाणी करणार्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार्या देशद्रोही प्रवृत्तींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कायद्याप्रमाणे थेट हात छाटण्याची कडक शिक्षा दिली पाहिजे, असे जाहीर आणि आक्रमक प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले आहे. अशा नराधमांना अशी जन्माची अद्दल घडवली तरच पुढे कोणाचीही पेपर फोडण्याची छाती होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
वर्षानुवर्षे अत्यंत गरिबीत आणि कष्टाने अभ्यास करून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहणार्या प्रामाणिक मुलांच्या पाठीत हा पेपरफुटीचा खंजीर खुपसण्यात आला आहे. लाखो रुपये मोजून श्रीमंतांची मुले पुढे निघून जातात आणि रात्रंदिवस पुस्तकात डोके घालून अभ्यास करणारा शेतकरी, शेतमजुराचा मुलगा मात्र या गैरप्रकारामुळे फेकला जातो. हे भयंकर पाप असून यामुळे निष्पाप तरूणांच्या डोक्यात व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चिड आणि असंतोष निर्माण होत आहे. शासकीय नोकरभरतीसाठी घेतल्या जाणार्या विविध संगणकीय परीक्षांमध्येही असाच सावळागोंधळ आणि पेपरफुटी सातत्याने समोर येत असल्याने गरीब कुटुंबातील हुशार मुलांवर मोठा अन्याय होत आहे. गेल्या तेरा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्यात राहिली असून त्यामुळे या संपूर्ण परीक्षा पद्धतीच्या पारदर्शकतेवर आता आहे. वीस वर्षांपूर्वी देशातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ’आयआयटी’च्या प्रवेश परीक्षेतही असेच संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, मात्र त्यानंतर यंत्रणेने तातडीने कठोर पावले उचलत परीक्षा पद्धतीत संपूर्ण बदल केले होते. आता त्याच धर्तीवर या वैद्यकीय परीक्षेमध्ये आणि शासकीय नोकरभरती प्रक्रियेत मोठे बदल करून पारदर्शकता आणण्याची गरज आहे, जेणेकरून कोणत्याही गरीब आणि कष्टकरी विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात ढकलले जाणार नाही.
शिवकाळातील शिक्षेची तीव्र गरज-पेपर फुटल्याचे ऐकून रात्रंदिवस मेहनत करणार्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनाला होणार्या वेदना सरकारला कधी कळणार? गरिबांच्या हक्काच्या नोकर्या आणि जागा पैशाच्या जोरावर श्रीमंतांच्या घशात घालणार्या शिक्षण माफियांचे हात थेट छाटलेच पाहिजेत, तरच या देशातील पेपरफुटी कायमची थांबेल.




